अंतर्गत चौकशीत पचौरींवर ठपका
By Admin | Updated: May 23, 2015 23:58 IST2015-05-23T23:58:04+5:302015-05-23T23:58:04+5:30
संस्थेचे संचालक डॉ. आर. के. पचौरी यांच्याविरुद्धच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये तथ्य आढळून आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

अंतर्गत चौकशीत पचौरींवर ठपका
नवी दिल्ली: ‘दि एनर्जी अॅण्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’च्या (टेरी) अंतर्गत तक्रार निवारण समितीने केलेल्या चौकशीत या संस्थेचे संचालक डॉ. आर. के. पचौरी यांच्याविरुद्धच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये तथ्य आढळून आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
रिसर्च अॅनॅलिस्ट म्हणून काम करणाऱ्या एका २९ वर्षीय महिला कर्मचाऱ्याने ७४ वर्षांच्या डॉ. पचौरी यांच्याविरुद्ध, कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाची, तक्रार केल्यानंतर ‘टेरी’च्या व्यवस्थापनाने ही चौकशी समिती स्थापन केली होती. चौकशीमध्ये डॉ. पचौरी यांच्या वतीने ३० तर फिर्यादी महिलेल्या वतीने १९ साक्षीदार तपासले गेले. समोर आलेल्या माहितीचा साकल्याने विचार केल्यानंतर फिर्यादीच्या आरोपात तथ्य असल्याचा निष्कर्ष समितीने काढला असल्याचे समजते.
या सहकारी महिलेशी डॉ. पचौरी यांचे वर्तन कार्यालयीन शिस्तीत न बसणारे व अशोभनीय असे होते. तसेच तिच्याशी वागताना डॉ. पचौरी यांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेतला, असेही समितीने नमूद केले असल्याचे सूत्रांनी सांगितले. डॉ. पचौरी यांनी या फिर्यादी महिलेस भरपाई द्यावी व संस्थेने पचौरी यांच्यावर करवाई करावी, अशी शिफारसही समितीने केली असल्याचे समजते.
वातावरण बदल आणि जागतिक तापमानवाढ याविषयी संशोधन करणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतर सरकारी संस्थेचे अध्यक्ष या नात्याने डॉ. पचौरी यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. या सहकारी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हाही नोंदविला असून त्यासंबंधीची फौजदारी कारवाई स्वतंत्रपणे सुरु आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)