महिलांच्या मासिक पाळीसंदर्भातील विटाळ अनेक ठिकाणी अद्यापही पाळला जात असल्याचं आपल्याला दिसून येतं. मात्र सार्वजनिक ठिकाणी असा विटाळ बहुतांशी पाळला जात नाही. पण तामिळनाडूतील कोईंबतूर येथील एका शाळेमध्ये आठवीतील एका विद्यार्थिनीला पाळी आल्याने चक्क वर्गाबाहेर बसवून पेपर लिहायला लावल्याची घटना समोर आली आहे.
कोईंबतूरमधील शाळेतील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये आठवीतील एक विद्यार्थिनी वर्गाबाहेर बसून पेपर लिहिताना दिसत आहे. मात्र या विद्यार्थिनीला अन्य कुठल्या कारणासाठी नव्हे तर तिची मासिक पाळी आलेली असल्याने वर्गाबाहेर बसवल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने गंभीर आरोप केले आहेत. सेंगुट्टई येथील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या या विद्यार्थिनीच्या आईने तिचा व्हिडीओ तयार केला आहे.
मुलीला वर्गाबाहेर बवलेलं पाहून ही महिला तिच्याकडे धावत जाते. तसेच तिला काय झालं असं विचारते. त्यानंतर तिला वर्गाबाहेर बसून कुणी पेपर लिहायला सांगितलं, असं या महिलेनं विचारलं असता सदर मुलगी प्राचार्यांनी आपल्याला बाहेर बसायला सांगितले, असं उत्तर देते. त्यानंतर या महिलेचा राग अनावर होतो. तसेच केवळ मासिक पाळी आलेली असल्याने मुलीला बाहेर बसवून परीक्षा द्यायला लावण्यात आल्याचा आरोप ही महिला करते.