नवी दिल्ली : राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने लक्षणीय विजय मिळविल्याने आणि संसदेत अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्यास सरकारला यश आल्याने संसदेचे सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात सत्ताधारी ‘विजेते’ ठरले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले.संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या आदल्या दिवशी भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत मोदी बोलत होते. सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असल्याने आणि सत्ताधाऱ्यांविषयी जनतेचा ‘मूड’ सकारात्मक असल्याने आर्थिक सुधारणा व विकासाचा अजेंडा अधिक नेटाने राबविण्यावर त्यांनी भर दिला. भाजपाच्या संसद सदस्यांना उद्देशून पंतप्रधान म्हणाले की, गरीब आणि वंचितांचे जीवनमान उंचावण्याची आपल्याला ही सुवर्णसंधी आहे. अधिक विकास आणि अधिक सुधारणा राबविण्याची हीच वेळ आहे.मोदी असेही म्हणाले की, सन २०१४ मध्ये आपल्याला निवडून देताना लोकांनी जी आशा मनात बाळगली होती ती आता विश्वासामध्ये परिवर्तित झाली आहे. विधानसभा निवडणुकांमधील पक्षाचे उज्ज्वल यश हे याचेच द्योतक आहे.मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असल्याने येत्या २४ मेपासून हाती घेण्यात येणाऱ्या महिनाभराच्या कार्यक्रमांची माहितीही बैठकीत देण्यात आली. संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार यांनी बैठकीतील कामकाजाची नंतर पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले की, लोकसभेने २१ व राज्यसभेने १४ विधेयके मंजूर केल्याने संसदेचे हे अधिवेशन खूपच विधायक ठरल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. मंजूर झालेल्या या विधेयकांमध्ये ‘जीएसटी’खेरीज राजकीयदृष्ट्या महत्वाचे असे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगासंबंधीच्या विधेयकाचाही समावेश आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)हनुमान : समर्पित समाजसेवकही बैठक हनुमान जयंतीच्या दिवशी होत असल्याचा उल्लेख करून मोदी यांनी रामभक्त हनुमानाचे वर्णन ‘समर्पित समाजसेवक’ असे केले आणि त्याच्यापासून सर्वांनीच स्फूर्ती घ्यायला हवी, असे सांगितले.मोदी हे गरिबांचे मसिहा!बैठकीत बोलताना माहिती आाणि नभोवाणीमंत्री व्यंकय्या नायडू यांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वगुणांची तोंड भरून स्तुती केली आणि मोदी हे ‘गरिबांचे मसिहा’ असल्याचा दावा केला. यासंदर्भत त्यांनी मंगळवारी झालेल्या ‘रालोआ’मधील ३३ पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीचा उल्लेख केला आणि अकाली दलाचे प्रकाश सिंग बादल व तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू यांनी मोदींच्या ‘परिवर्तनात्मक नेतृत्वा’चे कोतुक केल्याचे स्मरण दिले.
जनता आमच्या ठाम पाठीशी - पंतप्रधान
By admin | Updated: April 12, 2017 04:29 IST