आमची आघाडी ‘किंगमेकर’ ठरणार!
By Admin | Updated: October 6, 2014 04:42 IST2014-10-06T04:42:03+5:302014-10-06T04:42:03+5:30
राज्यात एकाही राजकीय पक्षाचे ७० पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत. त्यामुळे निवडणुकीनंतर कोणतेही दोन पक्ष एकत्र आले तरी त्यांना सत्ता स्थापनेसाठी तिसरा सहकारी सोबत घ्यावाच लागणार आहे

आमची आघाडी ‘किंगमेकर’ ठरणार!
प्रश्न: विधानसभा निवडणुकीनंतरचे चित्र कसे असेल?
आंबेडकर: राज्यात एकाही राजकीय पक्षाचे ७० पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत. त्यामुळे निवडणुकीनंतर कोणतेही दोन पक्ष एकत्र आले तरी त्यांना सत्ता स्थापनेसाठी तिसरा सहकारी सोबत घ्यावाच लागणार आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर महाराष्ट्र लोकशाही आघाडी ‘किंगमेकर’च्या भूमिकेत असेल. आमची भूमिका धर्मनिरपेक्ष राजकारण करणाऱ्या पक्षांसोबत जाण्याची असली तरी, निवडणुकीनंतरचे चित्र लक्षात घेऊन आघाडीचे घटक पक्ष सर्वसहमतीने निर्णय घेतील आणि तो भारिप-बहुजन महासंघाला मान्य असेल.
प्रश्न: याचा अर्थ तुमच्या पक्षाला भारतीय जनता पक्ष वा शिवसेनेचेही वावडे नसेल, असा घ्यायचा का?
आंबेडकर: राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. युती आणि आघाडीच्या ताटातुटीमुळे, या निवडणुकीत जो उमेदवार ३५ ते ४० हजार मतं घेईल, तो विजयी होण्याची दाट शक्यता आहे. तेवढी आमची क्षमता असल्याचे, यापूर्वीच्या अनेक निवडणुकींमध्ये अनेक मतदारसंघांमध्ये सिद्ध झाले आहे. आज किमान १४० मतदारसंघांमध्ये आमच्या आघाडीच्या उमेदवारांची स्थिती अतिशय चांगली आहे. आमच्या आमदारांची संख्या दोन आकड्यांमध्ये असेल हे नक्की! पण निवडणुकीनंतर नेमके काय चित्र समोर येते, यावरच पुढील वाटचाल अवलंबून असेल.
प्रश्न: पण भाजपचे नेते तर त्यांचा पक्ष स्वबळावर सत्तेत येणार असल्याचे आत्मविश्वासाने सांगत आहेत....
आंबेडकर: राज्यातील भाजप नेते पूर्णत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अवलंबून आहेत. मतं वळविण्याची क्षमता असलेला एकही प्रभावी नेता राज्यात भाजपकडे नाही. देवेंद्र फडणवीस यांना समोर केल्यास बहुजन समाज दुरावण्याचा धोका आहे. एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, तर पंकजा मुंडे नवख्या आहेत. त्यामुळे स्वबळावर सत्ता मिळविणे भाजपसाठी अतिशय कठीण आहे.
प्रश्न: तुमची आघाडी चार प्रमुख पक्षांपेक्षा वेगळी कशी?
आंबेडकर: सत्ताधारी पक्षानी पाच वर्षे विकासासाठी कोणतेही मोठे निर्णय घेतले नाहीत. भाजप, शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुढील पाच वर्षात काय करायचे, याचे कोणतेही नियोजन नाही. या सर्वच राजकीय पक्षांचा हेतू जनकल्याण हा नसून, केवळ ‘प्रॉफिट मेकिंग’ एवढाच आहे. त्यामुळे राज्याच्या विकासाशी कुणालाही देणेघेणे नाही. मुंबई महापालिकेत शिवसेना गत अनेक वर्षांपासून सत्तेत असून, या पक्षाने आतापर्यंत रस्त्यांच्या कामांवर तब्बल पाच लाख कोटी रुपये खर्च केले आहेत; मात्र तरीही एमएमआरडीएचे रस्ते सोडले तर मुंबईतील रस्त्यांची अवस्था राज्यातील इतर रस्त्यांसारखीच आहे. मग यांना कॉंग्रेस-राकॉंवर रस्त्यांच्या मुद्यावरून टीका करण्याचा काय अधिकार?
प्रश्न: यापुढील काळात या चळवळीचे भविष्य काय असेल? नेत्यांना बाजूला ठेवून आंबेडकरी जनतेला एकत्र आणण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहात काय?
आंबेडकर: रिपब्लिकन ऐक्याचा विषय मी माझ्यापुरता कधीच बाद करून टाकला होता. रिपब्लिकन ऐक्यासाठी मीदेखील प्रयत्न केले आहेत; पण केवळ स्वत:पुरता विचार करणाऱ्या नेत्यांमुळे काही होऊ शकत नाही, हे लक्षात आल्यामुळे मी तो विषयच माझ्यापुरता संपवून टाकला. पटत नसूनही केवळ सत्तेच्या लालसेपोटी आजवर एकत्र असलेल्या युती आणि आघाडीतील घटस्फोटाच्या पाशर््वभूमीवर महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळीला वेगळे वळण मिळण्याची शक्यता असून, त्यासाठी प्रत्येकाने कामाला लागण्याची गरज आहे.
प्रश्न: रिपब्लिकन पक्षाची शकले उडणे सुरूच राहिल्यास मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला राज्यात पाय रोवण्याची संधी मिळणार नाही का?
आंबेडकर: मायावती यांच्यावर घोटाळ्यांचे अनेक आरोप आहेत. त्यामुळे सध्या त्या केंद्रातील भाजप सरकारच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. बहुजन समाज पक्ष चळवळीचा पक्ष राहिला नसून, व्यक्तीकेंद्रीत झाला आहे. बसपाची अवस्था आता रामदास आठवलेंसारखी झाली आहे. बसपाला महाराष्ट्रात जनाधार नसतानाही, राष्ट्रवादी कॉंँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्या पक्षाला विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ८० जागा देऊ केल्या होत्या; परंतु केवळ भाजपला नुकसान पोहचवायचे नाही या एकमेव उद्देशाने, बसपाने पवारांचा प्रस्ताव धुडकावून लावला.