महाराष्ट्रात लवकरच संघटनात्मक बदल
By Admin | Updated: May 20, 2014 03:10 IST2014-05-20T03:10:53+5:302014-05-20T03:10:53+5:30
महाराष्ट्रासह इतर कुठल्याही राज्यातील काँग्रेसचे मुख्यमंत्री बदलण्याबाबत काँग्रेस कार्यसमितीच्या आजच्या बैठकीत कुठलाही निर्णय झाला नाही.

महाराष्ट्रात लवकरच संघटनात्मक बदल
नवी दिल्ली : महाराष्ट्रासह इतर कुठल्याही राज्यातील काँग्रेसचे मुख्यमंत्री बदलण्याबाबत काँग्रेस कार्यसमितीच्या आजच्या बैठकीत कुठलाही निर्णय झाला नाही. तथापि, संघटनात्मक बदलांचे अधिकार पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना देण्यात आले असून, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात हे बदल लवकरच होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक चार महिन्यांनी होणार आहे. अशा वेळी मुख्यमंत्री बदलणे कितीपत उचित ठरेल, यावर मात्र कार्यसमितीच्या बैठकीत चर्चा झाली, असे सूत्रांनी सांगितले. आता मुख्यमंत्री बदलायचे तर नव्या मुख्यमंत्र्यांना दीड ते दोन महिन्यांचाच कालावधी मिळेल. मंत्रिमंडळ स्थिरस्थावर होईपर्यंत निवडणूक आलेली असेल. हे लक्षात घेता मुख्यमंत्री बदलणे कितपत उचित ठरेल, असा सूर व्यक्त झाला. अपयश हे केवळ महाराष्ट्रात झालेले नाही. यामुळे महाराष्ट्रातील पराभवासाठी तेथील मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरणे उचित ठरणार नाही, असा एक विचारप्रवाह आहे. तथापि महाराष्ट्रासह अन्य काँग्रेसशासित राज्याचे मुख्यमंत्री बदलायचे असतील तर त्याचा निर्णय सोनिया गांधी घेतील, असे स्पष्ट करण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात बदल मात्र तातडीने केले जाऊ शकतात, असे एका ज्येष्ठ नेत्यान सांगितले. (विशेष प्रतिनिधी)