नवी दिल्ली: रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या मुद्द्यावर विरोधकांनी स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेतली. या सगळ्या प्रकरणात अपप्रचार आणि दिशाभूल करण्यासाठी रोहित वेमुलाच्या कुटुंबीयांना पैशांचे आमिष दाखवण्यात होते, असा आरोप केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी केला. ते बुधवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. दोन दिवसांपूर्वीच रोहित वेमुलाच्या कुटुंबीयांनी इंडियन युनियन मुस्लिम लीगवर (आययूएमएल) पैशांचे आमिष दाखवल्याचे आरोप केले होते. मुस्लिम लीगने आपल्यालाला घर आणि 20 लाख रुपये देऊ, असे सांगितले होते. मात्र, त्यानंतर या आश्वासनाचे गाडे पुढे सरकलेच नाही. आम्हाला आमिष दाखवून राजकीय पक्षांनी आमचा वापर करून घेतला, असे वेमुला कुटुंबीयांनी म्हटले होते. या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर पियूष गोयल यांनी विरोधकांचा समाचार घेतला. त्यांनी म्हटले की, रोहित वेमुलाच्या आईने केलेले आरोप ऐकून मी चिंतीत झालो आहे. विरोधक या मुद्द्यावरून आणखी किती राजकारण करणार आहेत? वेमुला कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. याचा फायदा घेऊन विरोधकांनी आपले राजकारण साधण्यासाठी दबावाखाली असलेल्या रोहित वेमुलाच्या आईला पैसे देण्याचे आमिष दाखवले. विरोधकांनी त्यांना प्रचारसभांमध्ये बोलायला लावले. रोहित वेमुलाच्या आत्महत्येविषयी खोटी माहिती देण्यासाठी प्रवृत्त केले. त्यानंतर वेमुला कुटुंबीयांना दिलेले आश्वासनही विरोधकांनी पाळले नाही. हा सर्व प्रकार निषेधार्ह असल्याचे गोयल यांनी सांगितले. दरम्यान, आता या सगळ्याला काँग्रेससह विरोधी पक्ष काय प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
खोट्या प्रचारासाठी विरोधकांनी रोहित वेमुलाच्या आईला दिली होती 20 लाखांची ऑफर- भाजपा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 13:42 IST