प्रथमच लोकसभाध्यक्षांना विरोधकांनी बनविले लक्ष्य
By Admin | Updated: April 23, 2015 23:39 IST2015-04-23T23:39:06+5:302015-04-23T23:39:06+5:30
कालपर्यंत सरकारला घेरणाऱ्या विरोधकांनी गुरुवारी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनाच लक्ष्य बनवत आम आदमी पार्टीचे खासदार भगवंत मान यांचे विधान

प्रथमच लोकसभाध्यक्षांना विरोधकांनी बनविले लक्ष्य
शीलेश शर्मा, नवी दिल्ली
कालपर्यंत सरकारला घेरणाऱ्या विरोधकांनी गुरुवारी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनाच लक्ष्य बनवत आम आदमी पार्टीचे खासदार भगवंत मान यांचे विधान कामकाजातून न वगळण्यासाठी जोरदार दबाव आणला. प्रथमच विरोधकांनी लोकसभा अध्यक्षांशी थेट संघर्ष पुकारल्याचे चित्र बघायला मिळाले.
राजस्थानमधील शेतकरी गजेंद्रसिंग याच्या जाहीर आत्महत्येचे प्रकरण अपेक्षेप्रमाणे सभागृहात तापले. गजेंद्रचा मृत्यू देशाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लावणारा आहे. तो व्यवस्थेमुळे दु:खी होता. आम्हाला व्यवस्था ताळ्यावर आणावी लागेल केवळ ‘मन की बात ’ केल्याने ही व्यवस्था बदलणार नाही, असे विधान मान यांनी केल्यानंतर सत्ताधारी सदस्यांनी एकच गदारोळ केला. अध्यक्ष महाजन यांनी ‘मन की बात’ संबंधी त्यांचे वक्तव्य कामकाजातून वगळण्याचा आदेश देताच विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. सोनिया गांधी यांनी आपल्या आसनावर बसूनच विरोध दर्शवित काँग्रेसच्या सदस्यांना विरोध करण्याचे आवाहन केले. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, दीपेंद्र हुडा, राजीव सातव यांच्यासह काँग्रेसच्या सदस्यांनी आक्रमक होत लोकसभा अध्यक्षांनाच जाब विचारला. गदारोळ होत असतानाच संपूर्ण विरोधक अध्यक्षांनी दिलेल्या आदेशावर एकजूट झाल्याचे दिसले.