विरोधकांनी मोदींचे आवाहन धुडकावले
By Admin | Updated: December 5, 2014 02:04 IST2014-12-05T02:04:16+5:302014-12-05T02:04:16+5:30
केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मौन सोडून राज्यसभेत स्पष्टीकरण दिले़ ज्योती यांनी माफी मागितली आहे़

विरोधकांनी मोदींचे आवाहन धुडकावले
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मौन सोडून राज्यसभेत स्पष्टीकरण दिले़ ज्योती यांनी माफी मागितली आहे़ त्यामुळे विरोधकांनी सभागृह चालू द्यावे, असे आवाहन त्यांनी केले़ मात्र पंतप्रधानांच्या स्पष्टीकरणाने समाधान न झालेल्या विरोधकांनी ज्योती यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली़ यामुळे गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही संसदेत या मुद्यावर प्रचंड गदारोळ झाला़
विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज पाच वेळाच्या स्थगितीनंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले़ लोकसभेत विरोधकांनी या मुद्यावर पंतप्रधानांच्या स्पष्टीकरणाची मागणी करीत सभात्याग केला़ पंतप्रधानांनंतर संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू आणि सभागृहाचे नेते तसेच अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही विरोधकांना संसदेचे कामकाज सुरळीत चालू देण्याची विनंती केली़ विरोधक मात्र याउपरही मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम राहिले़
ज्योती यांनी केवळ दिलगिरी व्यक्त केलेली आहे़ माफी मागितलेली नाही, याकडेही काँग्रेस, माकपा, जदयू आदी नेत्यांनी लक्ष वेधले़ या गोंधळात राज्यसभेचे कामकाज अनेकदा तहकूब करावे लागले आणि सरतेशेवटी दिवसभरासाठी तहकूब करण्यात
आले़
तिकडे लोकसभेत पंतप्रधानांनी या मुद्यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी करीत विरोधकांनी सभात्याग केला़ गत तीन दिवसांपासून ज्योती यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची आणि पंतप्रधानांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे़ सरकारने मात्र ज्योती यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हा मुद्दा संपल्याचे सांगून ही मागणी धुडकावून लावली होती़ (लोकमत न्यूज नेटवर्क)