निलंबनावरून विरोधक एकवटले
By Admin | Updated: August 5, 2015 02:07 IST2015-08-04T23:48:15+5:302015-08-05T02:07:18+5:30
लोकसभेचे कामकाज सुरू होताच डावे, सपा आणि राजद सदस्यांनी काँग्रेस खासदारांच्या निलंबनाचा मुद्दा उचलून धरला. लोकसभाध्यक्षांनी यास परवानगी नाकारत

निलंबनावरून विरोधक एकवटले
नवी दिल्ली : काँग्रेसच्या 25 खासदारांवर लोकसभाध्यक्षांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईविरोधात विरोधकांची एकजूट करण्यात मंगळवारी काँग्रेसला लक्षणीय यश मिळाले. लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकल्यानंतर तर काँग्रेस सदस्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली सभागृहाबाहेर धरणो दिले. अभूतपूर्व गोंधळानंतर राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर सोनिया गांधी कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. हा हल्ला परतवताना भाजपाने संसदीय पक्षाच्या बैठकीत लोकसभेचे कामकाज सुरू होताच डावे, सपा आणि राजद सदस्यांनी काँग्रेस खासदारांच्या निलंबनाचा मुद्दा उचलून धरला. लोकसभाध्यक्षांनी यास परवानगी नाकारत प्रश्नोत्तराचा तास पुढे रेटला. याच दरम्यान राजदचे जयप्रकाश नारायण यादव यांनी ‘निलंबन वापस लो’ची घोषणाबाजी सुरू केली. तृणमूल काँगे्रस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल (युनायटेड), राजद, सपा आणि डाव्यांसह अनेक विरोधी पक्षांचे सदस्य यात सहभागी झाले. यानंतर अण्णाद्रमुक आणि बिजू जनता दल हे दोन पक्ष वगळता सर्व विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.
राज्यसभेतही काँग्रेसने लोकसभेतील पक्ष सदस्यांच्या निलंबनावरून घातलेल्या गोंधळात प्रश्नोत्तर व शून्य प्रहराचा तास वाहून गेला. यानंतरही गोंधळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. सोमवारी काँग्रेसच्या सदस्यांनी फलक दाखवत घोषणा दिल्यानंतर लोकसभाध्यक्षांनी काँग्रेसच्या २५ सदस्यांना ५दिवसांसाठी निलंबित करण्याची घोषणा केली होती. दरम्यान, निलंबनाविरुद्ध काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असतानाच भाजप संसदीय पक्षाने विरोधी पक्ष नकारात्मक, गतिरोधक आणि विकास विरोधी असल्याचा आरोप करीत एक प्रस्ताव मंजूर केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)