असमान निधी वाटपावर विरोधक आक्रमक

By Admin | Updated: February 8, 2015 00:19 IST2015-02-08T00:19:25+5:302015-02-08T00:19:25+5:30

Opponent aggressive on unequal funding | असमान निधी वाटपावर विरोधक आक्रमक

असमान निधी वाटपावर विरोधक आक्रमक

>स्थायी समितीची बैठक : निधी लाटण्याचा प्रयत्न उधळला
नागपूर : जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांना विकास कामासाठी निधीचे समान वाटप व्हावे,यात भेदभाव सहन करणार नाही. अशी आक्रमक भूमिका घेत विरोधी सदस्यांनी निधी लाटण्याचा प्रयत्न शनिवारी स्थायी समितीच्या बैठकीत उधळून लावला.
तेराव्या वित्त आयोगाचा १,५९०००० चा निधी प्राप्त झाला आहे. वित्त समितीच्या सदस्यांना जादा तर इतरांना कमी असे निधीचे वाटप करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला. याला विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांनी विरोध दर्शविला. सर्व सदस्यांना समान विकास निधी द्यावा, अशी मागणी केली.
समाजकल्याण विभागातर्फे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल वाटप केले जाते. पुढील वर्षात १४०० सायकली वाटपाचे नियोजन केले आहे. समाजकल्याण समिती सदस्यांना जादा तर इतर सदस्यांना सायकल वाटपाचा कमी कोटा देण्याचा प्रयत्न होता. याला विरोध दर्शवून सर्व सदस्यांना समान कोटा मिळावा अशी सूचना कुंभारे यांनी मांडली.
सायकलीसाठी २१११ विद्यार्थ्यांनी सदस्यांच्या माध्यमातून अर्ज केलेले आहेत. यातून सर्व सदस्यांनी शिफारस केलेले अर्ज मंजूर करावे, अशी सूचना सदस्यांनी केली. अध्यक्ष निशा सावरकर यांनी सदस्यांवर अन्याय होणार नाही. सर्वाना समान निधी व सायकल वाटपात समान न्याय दिला जाईल, अशी ग्वाही दिली. बैठकीला उपाध्यक्ष शरद डोणेकर, सभापती आशा गायकवाड, उकेश चव्हाण, पुष्पा वाघाडे व सुनील गेडाम यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Opponent aggressive on unequal funding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.