Operation Sindoor news in Marathi: 'काही तरी मोठं होणार आहे.' २२ एप्रिलपासून सुरू झालेली ही चर्चा अखेर खरी ठरली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत झालेल्या बैठकांतील चर्चांचे परिणाम पाकिस्तानसह जगाने बघितला. भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानातच थेट हवाई हल्ले केले. तब्बल ९ ठिकाणांना उद्ध्वस्त करत भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर मोहीम फत्ते केली. या मोहिमेबद्दल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लष्काराबद्दल अभिमान व्यक्त केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
२२ एप्रिल रोजी पहलगामजवळ असलेल्या बैसरन पठारावर पर्यटकांना घेरून दहशतवाद्यांनी हत्या केल्या. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानवर कारवाई व्हायला हवी, या मागणीने जोर धरला होता. त्यातच दिल्लीत लष्कराच्या बैठकांनाही वेग आला होता. या बैठका कशासाठी झाल्या, याचे उत्तर ७ मे रोजीच्या पहाटेला सर्व भारतीयांना आणि जगाला मिळाले.
वाचा >>'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
राहुल गांधींची ऑपरेशन सिंदूरनंतर पोस्ट
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर एक पोस्ट करत भावना व्यक्त केल्य. राहुल गांधींनी म्हटले आहे की, 'आम्हाला भारतीय लष्कराचा अभिमान आहे. जय हिंद.'
असदुद्दीन औवेसींनी ऑपरेशन सिंदूरनंतर व्यक्त केला आनंद
एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन औवेसी यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय लष्कराचे अभिनंदन केले.
असदुद्दीन औवेसी म्हणाले, "आपल्या सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या कारवाईचे मी स्वागत करतो. पाकिस्तानला अशा प्रकारे धडा शिकवणे आहे की, पुन्हा कधी पहलगाम घडू नये. पाकिस्तानातील दहशतवादी व्यवस्थेला पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकायला हवे. जय हिंद", अशी प्रतिक्रिया असदुद्दीन औवेसी यांनी व्यक्त केली आहे.