Operation Sindooor: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ रावबत भारताने प्रत्युत्तर दिले. भारताने केलेल्या या कारवाईविरोधात पाकिस्तानने ड्रोन, क्षेपणास्त्र डागून कुरापती करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानचा प्रत्येक वार भारताने नष्ट केला. यानंतर युद्धविराम घोषित करण्यात आला. परंतु, पाकिस्तानने त्याला केराची टोपली दाखवत काहीच तासांत पुन्हा भारताच्या अनेक भागांवर ड्रोन हल्ले केले. हेही हल्ले भारताने यशस्वीरित्या परतवून लावले. पाकिस्तानचा कुठलाच डाव भारताने यशस्वी होऊ दिला नाही. युद्धविराम झाला असला तरी पाकिस्तानवरील दबाव कायम असलेला पाहायला मिळत आहे. कारण पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून घेण्यात आलेल्या मोठ्या आणि महत्त्वाच्या निर्णयांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
भारताने युद्धविराम मान्य केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ही घोषणा केली. असे का? हा प्रश्न अनेकांच्या मनात आला. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी याचे उत्तर दिले. त्यांनी एका टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तीन डझन देश यासाठी सक्रिय होते. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच युद्धविराम शक्य झाला. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख करून डार यांनी सर्वांचे आभार मानले. भारताच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडले होते. भारत चर्चेला तयार नव्हता, मग पाकिस्तानला इतर देशांकडे विनवणी करावी लागली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. तोपर्यंत भारताने यावर सहमती दर्शविली नव्हती. ट्रम्प यांच्या पोस्टमुळेच १७ दिवसांपासून सुरू असलेला तणाव परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांच्या ६० सेकंदांच्या पत्रकार परिषदेने निवळला.
सिंधू कराराला दिलेली स्थगिती कायम राहणार
मिळालेल्या माहितीनुसार, युद्धविराम करारात कोणत्याही पूर्वअटी नव्हत्या. सिंधू नदी पाणी करार स्थगितच राहणार असल्याचे समजते. १९६० मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने केलेला हा करार भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या वितरण आणि वापराचे नियमन करतो. या कराराचा पाकिस्तानला फायदा झाला आहे, कारण पाकिस्तानला या नद्यांमधून एकूण पाण्याच्या सुमारे ८० टक्के पाणी मिळते. हे पाणी पंजाब आणि सिंध प्रांतांसाठी महत्त्वाचे आहे.
अटारी सीमा बंद राहणार
अटारी सीमा बंद राहणार आहे. सीमेपलीकडून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या हालचालींनंतर भारत आणि पाकिस्तानमधील अटारी-वाघा सीमा क्रॉसिंग पूर्णपणे बंद करण्यात आले. पंजाबमधील अटारी येथील चेकपोस्ट बंद करण्यात आले. वैध कागदपत्रांसह सीमा ओलांडणाऱ्यांना १ मे पूर्वी त्याच मार्गाने परतण्याचे निर्देश देण्यात आले होते.
भारत पाकिस्तान व्यापारावर निर्बंध
पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व प्रकारच्या आयातीवर असलेली बंदी राहणार असल्याचे समजते. मग ती थेट असो किंवा मध्यस्थ देशांद्वारे असो. याव्यतिरिक्त, पाकिस्तानमध्ये नोंदणीकृत जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यास मनाई आहे. भारतीय जहाजांना पाकिस्तानी बंदरांमध्ये प्रवेश नाकारला जात आहे. तसेच टपाल सेवाही बंद आहेत.
हवाई क्षेत्रही बंद
पाकिस्तानात जा-ये करणाऱ्या किंवा पाकिस्तानाच्या हद्दीतून येणाऱ्या विमानांसाठी भारताने आपले हवाई क्षेत्र बंद ठेवले आहे. ३० एप्रिलपासून भारताचे हवाई क्षेत्र पाकिस्तानसाठी बंद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे भारतीय हवाई हद्द सोडल्यानंतर पाकिस्तानी हवाई हद्दीतून उड्डाण करणाऱ्या परदेशी विमान कंपन्यांना लांब, पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्म, मीडिया स्ट्रीमिंग सेवा बंद
राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी भारत पाकिस्तानी कलाकार आणि कलाकारांवर बंदी घालत राहील. याव्यतिरिक्त, भारतात कार्यरत असलेल्या सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म, मीडिया स्ट्रीमिंग सेवा आणि मध्यस्थांना पाकिस्तानी मूळच्या वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट आणि इतर डिजिटल सामग्री स्ट्रीम करण्यास बंदी घातली जात आहे.
व्हिसा सेवा बंद
भारतातील पाकिस्तानी नागरिकांसाठी सर्व प्रकारचे व्हिसा निलंबित करणे सुरूच राहणार असल्याचे समजते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी सर्व प्रकारचे व्हिसा रद्द केले होते. भारतात असलेल्यांना २७ एप्रिलपर्यंत देश सोडण्याचे निर्देश दिले होते. वैद्यकीय व्हिसा २९ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला होता, त्यानंतर तोही रद्द करण्यात आला.