India Air Strike On Pakistan: भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीर आणि पंजाबमधील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. या कारवाईनंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचलाय. अमेरिकेचे परराष्ट्र धोरण आणि दक्षिण आशियातील तज्ज्ञ मायकेल कुगेलमन यांनी, यावेळी भारतानं पाकिस्तानवर अधिक जोरदार हल्ला चढवला असल्याचं म्हटलं. तसंच अशा परिस्थितीत दोन्ही देशांमधील परिस्थिती २०१९ पेक्षाही खराब होऊ शकते, असंही ते म्हणाले. २०१९ मध्ये भारतानं अनेक भागात हवाई हल्ले करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते.
वूड्रो विल्सन इंटरनॅशनल सेंटर फॉर स्कॉलर्समधील साऊथ एशिया इन्स्टिट्यूटचे संचालक कुगेलमन यांनी ऑपरेशन सिंदूरनंतरचा तणाव २०१९ पेक्षा अधिक गंभीर असल्याचं म्हटलं. भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा आहे. पाकिस्तानने प्रत्युत्तराचा दावा केला असून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची चर्चा आहे. यावरून दोन्ही देश २०१९ च्या संकटातून पुढे गेल्याचं दिसून येत असल्याचं ते म्हणाले.
रात्री पाकिस्तानवर हल्ला
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतीय लष्करानं पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत हे लष्करी हल्ले करण्यात आल्याची माहिती भारताच्या संरक्षण मंत्रालयानं दिली. जिथून भारतावर दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखण्यात आली होती, त्या पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारतीय लष्करानं जोरदार हल्ला करत ते नष्ट केले.
पाकिस्तानच्या कोणत्याही लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आलेलं नाही, असं भारतीय लष्करानं स्पष्ट केलंय. बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय या नऊ लक्ष्यांना लक्ष्य करण्यात आलं. हे दोन्हीही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना 'युद्धाची कारवाई' असं म्हटलं असून आपल्या देशाला चोख प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं सांगितलं. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी भारतानं पाकव्याप्त काश्मीरमधील कोटली आणि मुजफ्फराबाद आणि बहावलपूर येथे क्षेपणास्त्र हल्ले केल्याची माहिती दिली.