Operation Sindoor : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेऊन भारताने प्रत्युत्तर दिले आहे. भारताने दहशतवादाविरुद्ध "ऑपरेशन सिंदूर" राबवले आहे. ऑपरेशन सिंदूरची माहिती लष्कराने स्वतः त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर दिली. हल्ल्याची खरी वेळ अद्याप कळलेली नाही. पण हल्ल्याची अधिकृत माहिती मिळण्यापूर्वी काही मिनिटे आधी लष्कराने केलेली एक एक्स-पोस्ट व्हायरल होत आहे.
पाकिस्तानवरील हल्ल्याची अधिकृत माहिती रात्री उशिरा १:५१ वाजता समोर आली. याबाबत सैन्याच्या अधिकृत हँडलवरून पोस्ट करण्यात आली होती. पण या पोस्टच्या अगदी २३ मिनिटे आधी, म्हणजे पहाटे १:२८ वाजता, लष्कराने एक व्हिडीओ पोस्ट केला. पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले होते, "प्रहाराय सन्निहिताः, जयाय प्रशिक्षिताः"Ready to Strike, Trained to Win',अशी कॅप्शन दिली आहे.
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
हा एक मिनिट चार सेकंदांचा व्हिडीओ आहे. यात वेगवेगळ्या लष्करी कारवाया दाखवण्यात आल्या आहेत. कारवाईसाठी सज्ज असलेल्या रणगाड्या, शस्त्रे आणि सैनिकांची दृश्ये दाखवली आहेत.
लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' सुरू करण्याच्या फक्त २३ मिनिटे आधी हा व्हिडीओ पोस्ट केला होता. याच सुमारास हवाई दलाच्या जेट विमानांनी पाकिस्तानमध्ये हवाई हल्ला केला. पण सध्या हल्ल्याच्या नेमक्या वेळेबाबत लष्कराकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
लष्काराकडून हल्ल्याच्या वेळेची माहिती दिली
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानीदहशतवादी तळांवर हल्ले केले. रात्री १ वाजून ०५ मिनिटांपासून ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ९ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट करण्यात आले. पहलगाम हल्ल्यात झालेल्या निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर भारतीय सशस्त्र दलाने हाती घेतले. या ऑपरेशनमध्ये कुठेही निर्दोष नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेतली गेली अशी माहिती भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितले.