नवी दिल्ली - पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानीदहशतवादी तळांवर हल्ले केले. रात्री १ वाजून ०५ मिनिटांपासून ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ९ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट करण्यात आले. पहलगाम हल्ल्यात झालेल्या निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर भारतीय सशस्त्र दलाने हाती घेतले. या ऑपरेशनमध्ये कुठेही निर्दोष नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेतली गेली अशी माहिती भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितले.
नवी दिल्लीत भारतीय सैन्याने पत्रकार परिषद घेत हल्ल्याची सविस्तर माहिती दिली. या हल्ल्याबाबत भारतीय सैन्याच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरैशी यांनी म्हटलं की, ऑपरेशन सिंदूर २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना न्याय देण्यासाठी घेतले गेले. या कारवाईत ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. मार्च २०२५ मध्ये जम्मू काश्मीर येथे ४ जवानांची हत्या केली होती. त्या दहशतवाद्यांना पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर ट्रेनिंग दिले होते. मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी दहशतवादी तळांनाही ऑपरेशन सिंदूरमध्ये टार्गेट करण्यात आले असं त्यांनी सांगितले.
तसेच मरकज सुभानअल्लाह जैश ए मोहम्मदचं मुख्यालय होते. याठिकाणीही दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिले जायचे. ऑपरेशन सिंदूरमध्ये कुठल्याही सैन्य ठिकाणांना टार्गेट केले नाही, कुठल्याही नागरिकाला इजा झाली नाही. मागील ३ दशकांपासून पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत आहे. तिथे दहशतवादी कॅम्प आणि लॉन्चपॅड्स बनवले होते. उत्तरेकडील सवाई नाला आणि दक्षिणेकडील बहावलपूर येथे जे आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किमी अंतरावर आहे. तिथेही भारतीय सैन्याने हल्ला केला असं कर्नल सोफिया कुरैशी यांनी म्हटलं.
दरम्यान, हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह यांनीही पत्रकार परिषदेला संबोधित करत हल्ल्याची माहिती दिली. गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार ऑपरेशन सिंदूर आखण्यात आले. पाकिस्तानच्या मुजफ्फराबाद इथल्या लश्करच्या ट्रेनिंग सेंटरवर हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांनी याच ठिकाणी प्रशिक्षण घेतले होते. दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी भारताने ही कारवाई केली. बरनाला कॅम्प, सियालकोट येथील महमूना कॅम्प नष्ट करण्यात आले आहे असं व्योमिका सिंह यांनी सांगितले.