अरेरे...ओदिशातील शाळेत चक्क अटलबिहारी वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण
By Admin | Updated: September 14, 2015 13:16 IST2015-09-14T12:54:51+5:302015-09-14T13:16:47+5:30
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्याचे सांगत शोक व्यक्त करत मुख्याध्यापकाने शाळा बंद करविल्याची धक्कादायक घटना ओदिशामध्ये घडली आहे.

अरेरे...ओदिशातील शाळेत चक्क अटलबिहारी वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण
>ऑनलाइन लोकमत
बालासोर (ओदिशा), दि, १४ - माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्याचे सांगत शोक व्यक्त करत मुख्याध्यापकाने शाळेला सुट्टी दिल्याची धक्कादायक घटना ओदिशामध्ये घडली आहे. दिवंगत राष्ट्पती डॉ. एपीजे अब्दुल कलाम हयात असतानाच झारखडंमधील एका शिक्षिकेने त्यांना श्रद्धांजली वाहिल्याची घटना लोकांच्या अद्याप स्मरणात असतानाच ओदिशातील बालासोर जिल्ह्यातही असा प्रकार घडला आहे.
बालासोर जिल्ह्यातील बुंदखुंटा या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कमलाकांत दास हे शिक्षक प्रशिक्षणासाठी शुक्रवारी दुस-या शाळेत गेले होते. तिथे दास यांना अटलबिहारी वाजपेंयीचे निधन झाल्याची चुकीचे वृत्त समजले. दास यांनी या वृत्ताची खातरजमा न करताच शाळेत फोन केला व तत्काळ शाळा बंद करण्यास सांगितले. मुख्याध्यापकाची 'आदेशा'चे पालन करत शिक्षकांनीही शोकसभा भरवली, वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण करत शाळा बंद केली.
शाळेचा हा प्रताप स्थानिकांना समजताच त्यांनी थेट जिल्हाधिका-यांकडे तक्रार केली. मुख्याध्यापक कमलाकांत दास यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणीही याप्रसंगी करण्यात आली. 'वाजपेयींच्या निधनाचे चुकीचे वृत्त पसरवणारे मुख्याध्यापक दास यांना निलंबित करण्यात येणार असून गरज पडल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल ' असे अधिका-यांनी सांगितले. माजी पंतप्रधान वाजपेयी गेल्या अनेक वर्षापासून आजारी असून ते जास्त बाहेर पडत नाहीत, मात्र त्यांची प्रकृती उत्तम आहे.