...तरच मोदी पुन्हा पंतप्रधान होतील - शंकराचार्य
By Admin | Updated: January 18, 2015 14:37 IST2015-01-18T14:37:45+5:302015-01-18T14:37:45+5:30
नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे असेल तर हिंदूंनी १० मुलांना जन्म द्यावा असे विधान बद्रीकाश्रमचे शंकराचार्य वासूदेवानंद सरस्वती यांनी केले आहे.
...तरच मोदी पुन्हा पंतप्रधान होतील - शंकराचार्य
ऑनलाइन लोकमत
अलाहाबाद, दि. १८ - नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे असेल तर हिंदूंनी १० मुलांना जन्म द्यावा असे विधान बद्रीकाश्रमचे शंकराचार्य वासूदेवानंद सरस्वती यांनी केले आहे. हिंदू एकत्र झाल्यानेच मोदी पंतप्रधान बनू शकले असा दावाही त्यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून हिंदूंनी किती मुलांना जन्म द्यावा याविषयी हिंदूत्ववादी नेत्यांकड़ून वादग्रस्त विधानांची मालिका सुरु आहे. या मालिकेत आता शंकराचार्य वासूदेवानंद सरस्वती यांनीही नंबर लावला आहे. अलाहाबादमधील एका कार्यक्रमात वासूदेवानंद सरस्वती म्हणाले, हिंदूमुळे मोदी पंतप्रधान झालेत, ते बहुमतामध्ये राहावे यासाठी हिंदू दाम्पत्त्यांनी १० मुलांना जन्म द्यायला हवा. यातील एकाला शेती, आयएएस, सैन्य, अंतर्गत सुरक्षा आणि सामाजिक कार्यात पाठवून द्यायला हवे. उर्वरित मुलांना आमच्याकडे द्यावे आम्ही त्यांना साधू बनवू असे त्यांनी नमूद केले.
शनिवारी अन्य एका कार्यक्रमातही सरस्वती यांनी घर वापसीवर टीप्पणी केली. 'ख्रिश्चन, इस्लाम आणि शिख हे धर्म हिंदू धर्मातूनच तयार झाले होते. या सर्वांनी त्यांच्या मूळ धर्मात परतणे गरजेचे असून घर वापसीवर बंदी टाकायला नको असे त्यांनी सांगितले. यापूर्वी भाजपाचे खासदार साक्षी महाराज, साध्वी प्राची यांनीदेखील चार अपत्यांचा नारा दिला होता.