संसदेत फक्त एका व्यक्तीचाच आवाज - राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
By Admin | Updated: August 6, 2014 16:20 IST2014-08-06T12:56:45+5:302014-08-06T16:20:41+5:30
संसदेत विरोधकांना बोलू दिले जात नसून संसदेत फक्त एका व्यक्तीचाच आवाज ऐकला जातो असा सणसणीत टोला राहुल गांधींनी लगावला आहे.

संसदेत फक्त एका व्यक्तीचाच आवाज - राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ६ - देशभरात जातीय दंगली वाढत असल्याच्या मुद्द्यावरुन लोकसभेत आक्रमक पवित्रा घेणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्ताधा-यांवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. संसदेत विरोधकांना बोलूच दिले जात नसून संसदेत फक्त एका व्यक्तीचाच आवाज ऐकला जातो असा सणसणीत टोला राहुल गांधींनी लगावला आहे.
लोकसभेत बुधवारी काँग्रेसने जातीय दंगलीचा विषय संसदेत उपस्थित केला. उत्तरप्रदेश आणि देशाच्या अन्य भागांमध्ये सुरु असलेल्या जातीय दंगलींवरुन चर्चा व्हावी अशी मागणी काँग्रेस खासदारांनी लावून धरली. मात्र लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी चर्चेला परवानगी नाकारली. यानंतर काँग्रेसचे खासदार लोकसभा अध्यक्षांच्या आसनासमोर आले व त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हेदेखील घोषणाबाजी करत पुढे आले. राहुल गांधींच्या या आक्रमक पवित्र्यामुळे काँग्रेस खासदारांमध्येही बळ संचारले होते. लोकसभेत आम्हाला बोलू दिले जात नाही. संसदेत फक्त एका व्यक्तीचाच आवाज ऐकला जातो असा आरोप राहुल गांधींनी केला.
संसदेबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले, आम्हाला जातीय दंगलीवरुन चर्चा करायची होती. मात्र या सरकारला चर्चा नकोच असते. सर्वनिर्णय एकतर्फी घेतले जातात अशी टीकाही त्यांनी केली.