हिंदुत्वामुळेच देशात एकता निर्माण होईल - मोहन भागवत
By Admin | Updated: January 19, 2015 10:55 IST2015-01-19T10:55:47+5:302015-01-19T10:55:48+5:30
हिंदुत्वामुळे देशात एकता निर्माण होईल असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा राग आळवला आहे.

हिंदुत्वामुळेच देशात एकता निर्माण होईल - मोहन भागवत
>ऑनलाइन लोकमत
सागर, दि. १९ - ' हिंदुत्वामुळे देशात एकता निर्माण होईल' असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा राग आळवला आहे. मध्य प्रदेशमधील सागर येथे संघाच्या शिबिरादरम्यान बोलताना त्यांनी हे विधान केले.
'आपल्या देशात विविधता दिसून येते. मात्र अनेक पंथ, प्रांत आणि भाषांना एकमेकांशी जोडण्याचे कार्य फक्त हिंदुत्वामुळेच साकार होऊ शकते. हिंदुत्व सर्वांचा स्वीकार करते', असे भागवत म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी इस्रायलपासून धडा घेण्याचा सल्लाही दिला. 'आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हाच आणखी एक राष्ट्र अस्तित्वात आले होते, ते म्हणजे इस्रायल. त्या देशाच्या स्वातंत्र्याची जेव्हा घोषणा होत होती, तेव्हाच आजूबाजूच्या आठ देशांनी त्याच्यावर हल्ला केला. आत्तापर्यंत इस्रायलने पाच युद्ध लढली आहेत. एकेकाळी वाळवंट आणि ओसाड भूमी असलेला हा देश आज नंदनवन बनला आहे असे सांगत त्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचा सल्ला दिला.
इस्रायलमधील नागरिकांकडे वाकड्या नजरेने पहायचे साहस कोणीही करत नाही अशा शब्दांत त्यांनी त्यांची स्तुती केली. आणि जे असं करतात त्यांना त्याचे शासन मिळते, हेच त्यांचे सामर्थ्य आहे, असे भागवत म्हणाले. जेव्हा देश सशक्त असतो तेव्हा घर-दार सर्व सुरळीत असते आणि जेव्हा देशाला धोका असतो तेव्हा जीवन सुरक्षित नसते, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी लोकांना संघात येण्याचे, तिकीटाची लालसा न बाळगता सेवा करण्याचे आवाहन त्यांनी केले.