केरळमध्ये फक्त फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मिळणार दारु
By Admin | Updated: December 29, 2015 13:38 IST2015-12-29T12:23:24+5:302015-12-29T13:38:12+5:30
फक्त पंचतारांकीत हॉटेलमध्ये दारु विक्रीला परवानगी देणारे केरळ सरकारचे नवे मद्य धोरण मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले.

केरळमध्ये फक्त फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मिळणार दारु
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - फक्त पंचतारांकीत हॉटेलमध्ये दारु विक्रीला परवानगी देणारे केरळ सरकारचे नवे मद्य धोरण मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले. न्यायमूर्ती विक्रमजीत सेन आणि न्यायमूर्ती शिवा किर्ती सिंह यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. या निर्णयामुळे केरळमधील बारमध्ये यापुढे मद्यविक्री करता येणार नाही.
राज्य सरकारने नवे धोरण जाहीर केल्यानंतर केरळमधील अनेक बार मालकांनी बीअर आणि वाईन विक्रीला सुरुवात केली होती. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने २७ ऑगस्टला आपला निर्णय राखून ठेवला होता. केरळ बार हॉटेल असोशिएशनने केरळ सरकारच्या नव्या मद्य विक्री धोरणाविरोधात सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल केली होती.
राज्य सरकारचे धोरण भेदभाव करणारे असल्याचा मुद्दा याचिकाकर्त्यांनी मांडला होता. केरळ उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या मद्य धोरणाला मान्यता दिली होती. तोच निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला असून आता बारमध्ये नव्हे तर फक्त पंचतारांकित हॉटेल्समध्ये मद्य विकता येईल.
दरम्यान बिहारमध्येही पुढच्यावर्षी १ एप्रिल पासून मद्यविक्री टप्याप्याने बंद होणार आहे.