७४७५ केंद्रांवर केवळ १२ हजार आधारकार्ड लिंक

By Admin | Updated: May 18, 2015 01:16 IST2015-05-18T01:16:18+5:302015-05-18T01:16:18+5:30

Only 12,000 base card links at 7475 centers | ७४७५ केंद्रांवर केवळ १२ हजार आधारकार्ड लिंक

७४७५ केंद्रांवर केवळ १२ हजार आधारकार्ड लिंक

> मतदार यादी शुध्दिकरण मोहिमेस नागरिकांकडून थंंड प्रतिसाद
पुणे : शहर, पिंपरी चिंचवड, आणि ग्रामीण भागात आधारकार्डचा क्रमांक मतदार यादीतील माहितीशी जोडण्याच्या, लिंक करण्याच्या जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या मोहिमेस अत्यंत निरुत्साही प्रतिसाद मिळाला. ७४७५ केंद्रांवर केवळ १२ हजार जणांनी आधारकार्ड लिंक केले. मतदार यादीच्या शुध्दिकरण मोहिमेस नागरिकांकडून मिळालेल्या या थंंड प्रतिसादामुळे शासकीय यंत्रणेचा वेळ, पैसा नाहक वाया गेला. नॅशनल वोटर्स सव्हिस पोर्टल या संकेतस्थळावर याबाबत असलेल्या सुविधेकडेही मतदारांंनी ढुंकून पाहिले नाही.
मतदार यादीतील माहिती अचूक असावी यासाठी आधारकार्डमधील माहिती या यादीत समाविष्ट केली जात असून त्यामुळे यादी दोष रहित असेल अशी शासनाची धारणा असून त्यासाठी दर रविवारी मोहिम सुरु आहे. विधान भवनातील जिल्हाधिकारी कार्यालय, जुन्या जिल्हा परिषद भवन येथील जिल्हा निवडणूक कार्यालय व १८ मतदान नोंदणी केंद्रांसह ७४७५ केंद्रांवर आज नागरिकांच्या सुटीच्या दिवशी ही मोहिम सुरु होती. ७० लाख मतदारांपैकी केवळ १२ हजार जणांनी सकाळी दहा ते सायंकाळी सहा दरम्यान या प्रक्रियेसाठी अर्ज भरु न दिले.
विधान भवनातील केंद्रात केवळ ९ तर जिल्हा निवडणूक कार्यालयात ८ जणांनी अर्ज भरुन दिले. एकूण १२ हजार जणांनी शहर, पिंपरी चिंचवड, आणि ग्रामीण भागात आधारकार्ड लिंक करण्याच्या प्रक्रियेस प्रतिसाद दिला.
जिल्हा निवडणूक अधिकारी समिक्षा चंद्राकार म्हणाल्या सर्व वर्तमानपत्रांंत या मोहिमेविषयी प्रसिध्दी करण्यात आली होती. आज सकाळी दहापासून सायंकाळी सहा पर्यंंत ७४७५ केंद्रांवर प्रत्येकी एक याप्रमाणे शिक्षक, तलाठी, मंडल अधिकारी नियुक्त केले होते. मात्र एकूण मतदारसंख्येच्या तुलनेत खूपच कमी प्रतिसाद आला.
ही मोहिम रविवारी कायम सुरु राहणार असून इतर दिवशीही १८ मतदान नोंदणी केंद्रांवर सुरु राहणार असून दुबार नावे असलेल्या मतदारांनी एका ठिकाणचे नाव वगळण्यासाठी अर्ज क्रमांक ६ भरून देणे आवश्यक आहे. अन्यथा दोन नावे असलेल्यांची नावे नोटिस देऊन वगळली जातील.
दोन वर्षांनी महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली असल्याने नगरसेवक, कार्यकर्ते यांंनी यादी शुध्दिकरण मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहन करुन त्या म्हणाल्या, आधारकार्डचा क्रमांक मतदार यादीतील माहितीशी जोडण्याच्या, लिंक करण्याच्या प्रक्रियेत अर्ज भरले जात असल्याने एक टक्का चूक होऊ शकते, मात्र नॅशनल वोटर्स सव्हिस पोर्टल या संकेतस्थळावर आधार या शीर्षकाखाली क्लिक केल्यास मतदारांना स्वत: किंवा जाणकार यांच्याकडून फक्त पाच ओळींची माहिती भरुन मतदार यादी अद्ययावत करता येईल. लिंक करण्यासाठी केंद्रांवर जाण्याची गरज राहणार नाही.
__________--------------
चौकट
दारुवाला पुलाजवळ नागरिकांना हेलपाटा
दारुवाला पुलाजवळील जीवनधारा मतिमंदांची शाळा येथे आधारकार्डचा क्रमांक मतदार यादीतील माहितीशी जोडण्याच्या, लिंक करण्याच्या प्रक्रियेसाठी गेलेल्या नागरिकांना नोंदणीसाठी कोणीही शासकीय व्यक्ती हजर नसल्याने घरी परतावे लागले. या शाळेच्या शिपायाला मात्र दिवसभर रखडावे लागले. जिल्हा निवडणूक अधिकारी समिक्षा चंद्राकार यांच्याकडे याबाबत तक्रार करण्यात आली. चंद्राकार म्हणाल्या, कोण गैरहजर होते त्याची चौकशी उद्या केली जाणार आहे. शिक्षकांचा बहिष्कार या मोहिमेवर होता. मात्र सर्व ठिकाणी नोंदणीचे काम सुरु होते. एखाद्या ठिकाणी नोंदणीसाठी कोणी हजर नसल्यास वयैक्तिक अडचण असू शकते.

Web Title: Only 12,000 base card links at 7475 centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.