नवी दिल्ली : दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविण्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म व ऑनलाइन पेमेंट सेवा यांचा गैरवापर करण्यात येत असल्याचे फायनान्शिअल ॲक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) म्हटले आहे. अशा प्रकारच्या अर्थपुरवठ्यावर बारकाईने लक्ष ठेवणाऱ्या एफएटीएफने हा दावा करताना पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचाही उल्लेख केला. आर्थिक पाठबळ असल्याशिवाय कोणीही असा हल्ला करणे शक्यच नाही, असेही या संस्थेने म्हटले आहे.
एफएटीएफने आपल्या अहवालात म्हटले आहे की, काही दहशतवादी संघटनांना काही देशांच्या सरकारांकडून आर्थिक तसेच अन्य स्वरूपाचे पाठबळ मिळाले आहे आणि अजूनही मिळत आहे. त्यात दहशतवादी कारवायांना थेट आर्थिक मदत, अन्य साहित्याचा पुरवठा, घातपाती कारवायांचे प्रशिक्षण देणे अशा गोष्टींचा सहभाग आहे. जगभरातील बहुतांश देशांमध्ये झालेल्या घातपाती कारवायांचे विश्लेषण एफएटीएफने केले आहे.
पुलवामा हल्ला; सात परदेशी नागरिकांवर गुन्हेभारतातील एका दहशतवादी हल्ल्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर करून काही गोष्टी खरेदी केल्याच्या प्रकरणाकडे एफएटीएफने लक्ष वेधले होते. या हल्ल्यात वापरलेली ॲल्युमिनियम पावडर एका ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करण्यात आली होती.
स्फोटाची तीव्रता वाढविण्यासाठी या पावडरचा उपयोग करण्यात आला होता. फेब्रुवारी २०१९ मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथे भारतीय सुरक्षा दलांच्या ताफ्यावर आत्मघाती बॉम्बहल्ला झाला होता. त्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मदने हा हल्ला घडविला, असा निष्कर्ष भारतीय तपास यंत्रणांनी चौकशीअंती काढला. या प्रकरणात १९ व्यक्तींवर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात सात परदेशी नागरिकांचा समावेश आहे. आरोपींची भारतातील संपत्तीही जप्त करण्यात आली होती.
गोरखनाथ मंदिरावर हल्ल्यासाठी विदेशातून आला निधीएफएटीएफच्या अहवालात म्हटले आहे की, ३ एप्रिल २०२२ रोजी गोरखनाथ मंदिरातील सुरक्षा जवानांवर हल्ला करणाऱ्याने ई-कॉमर्स प्लॅटफाॅर्मद्वारे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेला सहा लाख ६९ हजार रुपयांचा निधी पाठविला होता. त्या हल्लेखोराला त्यानंतर परदेशातून १० हजार रुपये धाडण्यात आले होते. दहशतवादी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म व ऑनलाइन मार्केटप्लेसद्वारे उपकरणे, शस्त्रे, रसायने, थ्रीडी प्रिंटिंग साहित्य खरेदी करतात. दहशतवादी स्वतःकडील वस्तू या प्लॅटफॉर्मद्वारे विकून त्यातून निधीदेखील उभारतात. मध्ये एक व्यक्ती एखादी वस्तू खरेदी करून ती दुसऱ्या व्यक्तीकडे पाठवतो. ती व्यक्ती ती वस्तू विकून त्या पैशांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करते. हा व्यवहार मनी लॉन्डरिंग पद्धतीसारखा असतो.