कांदे-बटाटे जीवनावश्यक
By Admin | Updated: July 3, 2014 08:52 IST2014-07-03T03:20:42+5:302014-07-03T08:52:55+5:30
बेसुमार साठेबाजी आणि काळाबाजार याला वेसण घालण्यासाठी तसेच कांदा आणि बटाटा सर्वसामान्यांना रास्त दरात मुबलक उपलब्ध

कांदे-बटाटे जीवनावश्यक
नवी दिल्ली : बेसुमार साठेबाजी आणि काळाबाजार याला वेसण घालण्यासाठी तसेच कांदा आणि बटाटा सर्वसामान्यांना रास्त दरात मुबलक उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्र सरकारने बुधवारी या दोहोंचा एक वर्षासाठी जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश केला. त्यामुळे बहुसंख्य जनतेच्या दैनंदिन आहाराचा अविभाज्य भाग असलेले कांदे-बटाटे जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या कक्षेत आले आहेत. परिणामी कांदे-बटाट्यांच्या साठेबाजीवर तसेच किमतीवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आर्थिक बाबींविषयक मंत्रिमंडळ समितीच्या (सीसीईए) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गरिबांना दिलासा देण्याच्या उद्देशाने सार्वजनिक वितरणप्रणालीमार्फत (स्वस्त धान्य दुकान) अतिरिक्त ५० लक्ष टन तांदूळ जारी करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.
कांदा व बटाट्याचा किती साठा करावा, हे राज्य सरकारे आपापल्या राज्यातील परिस्थितीनुसार ठरवतील. राज्याने ठरवलेल्या निर्धारित मर्यादेपेक्षा कोणालाही जास्त प्रमाणात कांदा व बटाट्याचा साठा करून ठेवता येणार नाही. कांदा व बटाटा जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५च्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतानाच साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे अधिकार राज्य सरकारांना दिले जात आहेत, असे कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकारांना सांगितले.