उत्तर प्रदेशमधील आरोग्य विभागातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यामुळे संपूर्ण व्यवस्थेचं पितळ उघडं पडलं आहे. एका व्यक्तीने एकाच नावावर राज्यातील सहा वेगवेगळ्या जिल्ह्यात एकाच वेळी तब्बल नऊ वर्षे नोकरी करून पगारापोटी कोट्यवधी रुपये उकळल्याचे उघडकीस आले आहे. मात्र तब्बल नऊ वर्षे ही व्यक्ती बिनबोभाटपणे धुळफेक करत असताना प्रशासनाला कानोकान खबरही न लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
उत्तर प्रदेश सरकारला गंडा घालणाऱ्या या व्यक्तीचं नाव अर्पित सिंह असं असून, त्याच्या वडिलांचं नाव अनिल कुमार सिंह आहे. त्याचा रहिवासी पत्ता प्रतापनगर शाहगंज, आग्रा असा आहे. अर्पित सिंह याने एकाच नावावर वेगवेगळी आधार कार्ड तयार करून त्याने फसवणूक केली. याच माध्यमातून तो सहा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी नोकरी करत होता.
उत्तर प्रदेशमध्ये ४०३ एक्स-रे टेक्निशियनची भरती झाली होती. त्याचवेळी अर्पित सिंह हा वेगवेगळ्या आधार कार्डच्या मदतीने सहा वेगवेगळ्या ठिकाणांहून नोकरीत घुसला होता. नऊ वर्षे सारं काही सुरळीत सुरू होतं. मात्र हल्लीच जेव्हा विभागाकडून मनुष्यबळाची पडताळणी करण्यात आली तेव्हा एकच व्यक्ती सहा वेगवेगळ्या जिल्ह्यात नोकरी करत असल्याचं उघडकीस आलं होतं. प्रत्येक ठिकाणी या व्यक्तीचं नाव, वडिलांचं नाव आणि पत्ता एकच होता. मात्र आधार कार्डचा क्रमांक वेगवेगळा होता. त्यामुळे बनावट आधार कार्डच्या माध्यमातून त्याने ही फसवणूक केल्याचे उघडकीस आले.
दरम्यान, एका एक्स-रे टेक्निशियनला सुमारे ५० हजार रुपये मासिक वेतन मिळतं. अशा परिस्थितीत त्याचं एक वर्षाचं वेतन हे सहा लाख रुपये एवढं होतं. त्याने एकूण ९ वर्षे नोकरी केली त्यामुळे त्याचे एका ठिकाणचे ९ वर्षांचे वेतन ५४ लाख रुपये होतं. अशा सहा ठिकाणचं मिळून अर्पित सिंह याने एकूण ३ कोटी २४ लाख रुपये वेतन म्हणून मिळवत सरकारला गंडा घातला. अखेरीस तपास आणि रिपोर्टच्या आधारावर लखनौमधीन वजीरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत तक्रार नोंदवण्यात आली. आता पोलीस आरोपी अर्पित सिंह याचा शोध घेत आहेत.