कर्मचा-यांना एक महिन्याची मुदतवाढ
By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:23+5:302015-09-01T21:38:23+5:30
पुणे : एफटीआयआयच्या कर्मचा-यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या निर्णयाला स्थगिती देत, संचालक प्रशांत पाठराबे यांनी एक महिन्याची मुदतवाढ देऊन मंगळवारी कर्मचा-यांना काहीप्रमाणात दिलासा दिला. तब्बल 83 दिवस सुरू असलेल्या या विद्यार्थी आंदोलनावर दि.31 ऑक्टोबर पर्यंत तोडगा निघेल, अशी आशाही संचालकांनी व्यक्त केली . दरम्यान वाढदिवसाच्या दिवशी संचालकांकडूनच गोड गिफ्ट मिळाल्याने विद्यार्थ्यांसह कर्मचा-यांनी जल्लोष करून संस्थेचा परिसर दणाणून सोडला.

कर्मचा-यांना एक महिन्याची मुदतवाढ
प ुणे : एफटीआयआयच्या कर्मचा-यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या निर्णयाला स्थगिती देत, संचालक प्रशांत पाठराबे यांनी एक महिन्याची मुदतवाढ देऊन मंगळवारी कर्मचा-यांना काहीप्रमाणात दिलासा दिला. तब्बल 83 दिवस सुरू असलेल्या या विद्यार्थी आंदोलनावर दि.31 ऑक्टोबर पर्यंत तोडगा निघेल, अशी आशाही संचालकांनी व्यक्त केली . दरम्यान वाढदिवसाच्या दिवशी संचालकांकडूनच गोड गिफ्ट मिळाल्याने विद्यार्थ्यांसह कर्मचा-यांनी जल्लोष करून संस्थेचा परिसर दणाणून सोडला. आश्चर्य म्हणजे कर्मचा-यांवर अन्याय केला जाऊ नये त्यांना कामावर परत घेण्यात यावे यासाठी दुस-या वर्षाचा सतीशकुमार हा विद्यार्थी मंगळवारी एक दिवसाकरिता उपोषणाला बसला होता, त्याची दखल घेत संचालकांनी हा निर्णय मंगळवारी सायंकाळी जाहीर केला. त्यांनी स्वत:च्या हाताने या विद्यार्थ्याला ज्यूस पाजला असल्याचे समजते. या आंदोलनामुळे संस्थेमधील सर्व कामकाज ठप्प झाले असून, येथील कर्मचा-यांच्या हातात कोणतेच काम नाही असा बागुलबुवा करीत संचालक प्रशांत पाठराबे यांनी दि. 1 सप्टेंबरपासून लाईट, साऊंड विभागासह कार्पेंटर, पेंटर आदी तंत्रज्ञ कामगारांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची जाहीर घोषणा केली होती. त्यानुसार मंगळवारपासून 82 कर्मचारी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. शासनाने दबावतंत्राचा वापर करीत हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी कर्मचा-यांनाच लक्ष्य केले आहे, आपल्यामुळे कर्मचा-यांचे भवितव्य धोक्यात आले आहे, किमान या भावनेपोटी का होईना विद्यार्थी आंदोलनाचे उगारलेले शस्त्र मागे घेतील, असा कुटील डाव शासनाचा असल्याचा आरोप स्टूडंट असोसिएशनने केला होता. काल पत्रकार परिषदेतही त्यांनी याचाच पुनरूच्चार केला. गेली 35 वर्षे संस्थेच्या साऊंड विभागात कार्य करणा-या नितीन पत्की यांनी संचालकांची संध्याकाळी भेट घेतली. तेव्हा कर्मचा-यांना एक महिन्यांची मुदतवाढ दिली असल्याचे स्वत: संचालकांनी सांगितले असल्याचे ते म्हणाले. संचालकांनी देखील पत्रक काढून आपला निर्णय जाहीर केला. त्यामध्ये म्हटल्यानुसार, संस्थेमध्ये विद्यार्थ्यांचे वर्ग, प्रोजेक्टसची कामे ठप्प होती, कर्मचा-यांना काहीच काम नव्हते. आंदोलनामुळे सर्व कामे बंद होती. संचालक म्हणून मी विद्यार्थ्यांच्या विरोधात नाही, पण ऑडिटमध्ये अडचणी येत असल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. मात्र अशी परिस्थिती निर्माण झाली की विद्यार्थी उपोषणाला बसला आणि मग मला हस्तक्षेप करण्यास भाग पडले. म्हणूनच विद्यार्थी आणि कंत्राटी कर्मचा-यांना भेटून या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी मी प्रयत्न करेन असे त्यांना सांगितले. यासंदर्भात मंत्रालयाशी चर्चा देखील केली. या आंदोलनावर महिन्याभरात काहीतरी तोडगा निघू शकेल असे वाटले म्हणून कंत्राटी कर्मचा-यांना एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा मी निर्णय घेतला. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे कर्मचा-यांचे आयुष्य धोक्यात आले आहे. याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा, आणि विद्यार्थी आणि शासन यामध्ये संवादाची दारे खुली व्हावीत असे त्यांनी नमूद केले. --------------------------------------------------------' या निर्णयाला एक महिन्याची मुदतवाढ मिळाली असली तरी अजूनही टांगती तलवार कायम आहे. विद्यार्थी आणि शासनाने यावर सामंजस्याने तोडगा काढावा. दोघांनी एकेक पाऊल मागे घ्यावे. आम्ही कुणाच्याही बाजूने नाही. आम्ही ना शासन ना विद्यार्थ्यांच्या बाजूने बोलू शकतो' राहुल पवार, कंत्राटी कामगार ---------------------------------------------------------' कर्मचा-यांना एक महिन्याची मुदतवाढ मिळाल्यानं खूप आनंद झाला आहे. ही एफटीआयआय संस्था आमच्यासाठी घरासारखी आहे. एका जरी सदस्याला त्रास झाला तरी चांगले वाटत नाही- सतीशकुमार, उपोषणकर्ता विद्यार्थी ----------------------------------------------------------