Ankush Bahuguna Youtube: सायबर गुन्ह्यांचे प्रकार सर्रास घडत असून, सुशिक्षित लोकही याचे बळी ठरत आहेत. युट्यूबर अंकुश बहुगुणा याच्यासोबतही असाच प्रकार घडला. त्याला तब्बल ४० तास डिजिटल अरेस्ट करून ठेवण्यात आले. यात त्याला पैसेही गमवावे लागले. अंकुश बहुगुणाने एक व्हिडीओ पोस्ट करून त्याच्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अंकुश बहुगुणाने एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात त्याने ४० तास त्याच्यासोबत काय घडले, याबद्दल सांगितलं आहे. युट्यूबवर ७.४५ लाख सब्स्क्रायबर असलेला अंकुश बहुगुणा कॉमेडी आणि मेकअप टिप्ससंदर्भात कॉन्टेंट क्रिएटर आहे.
अंकुश बहुगुणासोबत काय घडलं?
बहुगुणाने सांगितलं की, "मी जिमवरून आलो, तेव्हा मला एका नंबरवरून कॉल केला. मी काहीही विचार न करता कॉल घेतला. समोरून मला कुरिअरबद्दल विचारण्यात आले. कुरिअरमध्ये अवैध साहित्य सापडल्याचे मला सांगण्यात आले आणि माझ्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले असून, तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मी घाबरून गेलो."
"त्यानंतर व्हॉईस कॉल अचानक व्हॉट्सअप व्हिडीओ कॉलमध्ये बदलला. त्यात सायबर ठग हा पोलिसांच्या वर्दीत होता. त्याने सांगितले की, तुमच्यावर मनी लॉड्रिंग, ड्रग्ज पॅकेजचे गुन्हे आहेत. तो व्यक्ती काही गुन्हेगारांची नावे घेऊन माझी चौकशी करू लागला", असे अंकुश बहुगुणाने सांगितले.
हॉटेलमध्ये राहायला सांगितले अन्...
"अचानक घडलेल्या या सगळ्या प्रकाराने मी घाबरून गेलो. मी काही चुकीचे केले नाही, हे मला माहिती होते, पण अचानक उद्भवलेल्या परिस्थितीने हादरलो होतो. त्यानंतर पुढील ४० तास मी डिजिटल अरेस्ट होतो. मी कॉल बंद करू शकत नव्हतो, ना कुणाला कॉल करू शकत होतो", असे त्याने सांगितले.
"त्यांनी माझे बँकेची माहिती घेतली. त्यांनी माझ्याबद्दल खूप सारी माहिती घेतली. त्यांनी मला सांगितलं की, तुझ्या आईवडिलांचा जीव धोक्यात आहे. तू कुणाला कॉल केला, तर आम्ही तुला अटक करू. मी माझे पैसे गमावले आणि मला मानसिक हादरा बसला आहे", असा भयंकर प्रकार त्याने सांगितला.