झारखंडमधील लोहारदगा येथे मटार खाल्ल्याने एका दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिरव्या वाटाण्याचा दाणा मुलाच्या श्वासनलिकेत अडकला होता. ज्यामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. कारो पोलीस स्टेशन हद्दीतील गुडी करंजा टोली येथे ही घटना घडली.
खुदी ओरांव यांचा दीड वर्षांचा मुलगा शिवम ओरांव याला गुरुवारी त्याच्या कुटुंबाने शेतामध्ये नेलं होतं. तिथे खेळत असताना त्याने हिरव्या वाटाण्याचं एक रोप उपटून घरी आणले. चिमुकल्याने खेळताना मटारचा दाणा तोंडात टाकला. जेव्हा मुलाच्या घशात दाणा अडकला तेव्हा तो वेदनेने तळमळू लागला. प्रकृती बिघडत असल्याचं पाहून कुटुंबीयांनी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात नेलं जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष आणि बालरोगतज्ञ डॉ. गणेश प्रसाद या घटनेवर म्हणाले की, अन्ननलिका आणि श्वासनलिका दोन्ही शेजारी शेजारी आहेत. अन्न खाताना श्वासनलिका आपोआप बंद होते. पण बऱ्याच वेळा घाईघाईत जेवताना श्वासनलिका उघडी राहते आणि अन्न त्यात जाते. मुलांसोबत हे अनेकदा घडते.
काही काळापूर्वी असाच एक प्रकार समोर आला होता, ज्यामध्ये एका तीन वर्षांच्या मुलाच्या श्वासनलिकेमध्ये चिंचेचं बी अडकलं होतं. खूप प्रयत्न करूनही त्याचा जीव वाचू शकला नाही.डॉक्टरांनी सांगितलं की, जर ब्रॉन्कोस्कोपीची सुविधा उपलब्ध असेल तर अशा परिस्थितीत रुग्णाचा जीव वाचवता येईल. मुलं जेवत असताना त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे.