एकाच दिवशी उघडली दीड कोटी बँक खाती
By Admin | Updated: August 29, 2014 02:40 IST2014-08-29T02:40:37+5:302014-08-29T02:40:37+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक अस्पृश्यता संपविण्याचा नारा देत महत्त्वाकांक्षी आर्थिक समावेशन मिशन ‘जन-धन योजनेचा’ शुभारंभ केला

एकाच दिवशी उघडली दीड कोटी बँक खाती
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक अस्पृश्यता संपविण्याचा नारा देत महत्त्वाकांक्षी आर्थिक समावेशन मिशन ‘जन-धन योजनेचा’ शुभारंभ केला. या योजनेंतर्गत सर्व गरिबांना बँक खाती पुरविली जातील. उद्घाटनाच्या दिवशी गुरुवारी देशभरात १.५ कोटी खाती उघडण्याचा विक्रम नोंदला गेला. बहुदा जगभरात कधीही एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात बँक खाती उघडली गेली नसावी.
सरकार स्थापन झाल्यानंतर १०० दिवसांत नवी योजना आणताना मोदी म्हणाले की, २६ जानेवारी २०१५ पर्यंत या योजनेंतर्गत ७.५ कोटी लोकांना सामावून घेतले जातील. त्यांना रुपे- डेबिट कार्डवर शून्य रुपये जमा असतानाही बँक खाते दिले जाईल. त्यांना १ लाख रुपयांचा अपघाती विमा आणि ३० हजार रुपयांचा आयुर्विमाही दिला जाईल. नंतर त्यांना ५ हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट देण्याची सुविधा असेल.
यूएसएसडी प्लॅटफॉर्म...
मोदींनी बेसिक जीएसएम मोबाईल फोनच्या माध्यमातून बँकिंग सेवा उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रीय एकीकृत ‘यूएसएसडी प्लॅटफॉर्म’ देशाला समर्पित केला. आपण सर्वांनी मिळून लढा दिला तर गरिबीपासून मुक्ती मिळेल. देशाचा प्रत्येक नागरिक अर्थव्यवस्थेला जोडला गेला तरच गरिबीचा नायनाट करता येईल. सरकार आणि सरकारी संपत्ती गरिबांसाठीच आहे. देशातील ४० टक्के लोक आर्थिक अस्पृश्यतेचे शिकार बनले आहेत,असेही मोदी म्हणाले.
सावकारी पाशातून सोडवणार...
श्रीमंत आणि उद्योगपतींना कमी दरात कर्ज मिळते, मात्र गरिबांना पाचपेक्षा जास्त पटीने सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते. एखादी व्यक्ती एकदा का सावकाराच्या पाशात अडकली की आयुष्यभर बाहेर पडणे अशक्य होते. या स्थितीमुळे अशा लोकांवर आत्महत्येची वेळ येते असेही मोदींनी म्हटले.
देश आर्थिक महाशक्ती बनेल- राजनाथसिंह
चीन आणि अमेरिकेच्या बरोबरीने भारत जगात आर्थिक महाशक्ती बनेल, असा विश्वास केंद्रिय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी ‘जनधन’ योजनेचा लखनौ येथे प्रारंभ करताना व्यक्त केला. सरकारने ज्या पद्धतीने योजना सुरू केल्या ते पाहता जगातील तीन आर्थिक महासत्तांमध्ये भारताचा समावेश होईल, असा मला विश्वास आहे. या योजनेमुळे जनतेत ओळख मिळाल्याची भावना बळावेल आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवता येईल, असेही ते म्हणाले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)