घरातील बंद फ्रिजमध्ये महिलेचा मृतदेह सापडण्याची घटना पुन्हा एकदा घडली आहे. मध्य प्रदेशमधील देवास येथे फ्रिजमध्ये महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. येथील वृंदावन कॉलनीमधील एका घरामध्ये हा मृतदेह सापडला आहे. घरातील एका खोलीमधून तीव्र दुर्गंधी सुटल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या घरामध्ये भाडेकरू म्हणून राहणाऱ्या बलवीर सिंह यांनी घरमालक आणि स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये याबाबतची तक्रार दिली. त्यानंतर पोलीस जेव्हा घटनास्थळावर पोहोचले तेव्हा फ्रिजमध्ये महिलेचा मृतदेह असल्याचे दिसून आले.घटनेचं गांभीर्य पाहून फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या टिमला तातडीने बोलावण्यात आले. त्यांनी अत्यंत बारकाईने खोलीची पाहणी केली. मृतदेहाची अवस्था पाहता महिलेची हत्या करून तिचा मृतदेह फ्रिजमध्ये लपवण्यात आल्याचं दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या घरातील आधीचे भाडेकरू संजय पाटिदार यांनी जून महिन्यामध्ये घर रिकामी केलं होतं. मात्रा त्यांनी काही सामान मागे ठेवले होते. त्यात या फ्रिजचाही समावेश होता. तो एका खोलीत ठेववलेला होता. त्याच फ्रीजमध्ये आता एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे आधीच्या भाडेकरूनेच ही हत्या केली असावी, असा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, येथे नव्याने राहण्यासाठी आलेले भाडेकरू बलवीर सिंह यांनी सांगितले की, या खोलीमधून प्रचंड दुर्गंध येत होता. हा वास असह्य होता. त्यामुळेच मी या प्रकाराची माहिती घरमालक आणि पोलिसांना दिली. आता पोलीस आणि एफएसएलच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. महिलेची ओळख आणि हत्येचा कारणांची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांकडून प्रत्येक पैलू तपासून पाहिला जात आहे. तसेच घरमालक आणि इतर स्थानिकांकडेही चौकशी केली जात आहे.