Om Birla's discipline confirms to Minister of State, Raosaheb Danve | राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना ओम बिर्लांच्या शिस्तीचा प्रत्यय
राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना ओम बिर्लांच्या शिस्तीचा प्रत्यय

नवी दिल्ली : लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या शिस्तीची प्रत्यय केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि एकदा लोकसभा सदस्यांना मंगळवारी आला. पुन्हा प्रश्न विचारण्याची विनंती रावसाहेब दानवे यांनी खासदारास केल्याने ओम बिर्ला यांनी, ‘सन्माननीय मंत्री, प्रश्नांकडे लक्ष द्या. काळजीपूर्वक ऐका’, असे ऐकविले. त्यामुळे प्रश्न विचारणाऱ्या हेमंत गोडसे यांनाही क्षणभर काय झाले हे समजले नाही.
प्रश्नोत्तराच्या तासाला हा प्रकार घडला. पुरवणी प्रश्न विचारून खाली बसलेल्या हेमंत गोडसे यांना दानवेंनी पुन्हा प्रश्न विचारण्याची विनंती केली. त्यावर ओम बिर्ला नाराज झाले. दानवेंना सांगितल्यावर बिर्लांनी मोर्चा गोडसेंकडे वळवला. मी तुम्हाला आणखी एक संधी देतो, पण पुन्हा तोच प्रश्न विचारू नका, असे त्यांनी गोडसेंना सांगितले.
झालेला प्रकार अरविंद सावंत यांनी हेमंत गोडसेंना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर, मिस्टर सावंत, कृपया त्यांन सांगा, असे बिर्ला म्हणाले. गोडसेंच्या दुसºया प्रश्नाला मात्र सार्वजनिक वितरण केंद्रीय मंत्री रामविलास पासवान उत्तर देण्यास उभे राहिले.
पासवान यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तशाही स्थितीत ते उभे राहून उत्तर देत होते. बिर्ला यांनी त्यांनाही, आवश्यकता वाटल्यास खाली बसून बोला, अशी सूचना केली.
पासवान यांनी मात्र उभे राहूनच उत्तरे दिली. ते पाहून बिर्ला म्हणाले, मी तुम्हाला पुन्हा सांगतो. तुम्ही खाली बसूनही बोलू शकता. (उभे राहिल्याने) तुमचे दुखणे वाढेल! बिर्ला त्यांच्या शिस्तीमुळे
ओळखले जातात.
एकदा पुरवणी प्रश्न विचारण्यासाठी नाव पुकारल्यावर सदस्य सभागृहात नसल्याचे आढळले. त्यावरून बिर्लांनी नाराजी व्यक्त केली होती. यापुढे असे घडल्यास संपूर्ण अधिवेशनात संबधित खासदारास पुरवणी
प्रश्न विचारू देणार नाही, असे काही दिवसांपूर्वी त्यांनी सुनावले होते.

Web Title: Om Birla's discipline confirms to Minister of State, Raosaheb Danve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.