नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टी (भाजपा)च्या संसदीय मंडळातून पक्षाचे संस्थापक राहिलेले अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या ‘त्रिमूर्तीं’ना डच्चू देण्यात आला आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्राबल्य दाखवणारा हा निर्णय म्हणजे भाजपातील एका ज्येष्ठ पिढीचा राजकारणातील अस्त असल्याचे मानले जात आहे़
संसदीय मंडळातून वगळून वाजपेयी, आडवाणी आणि जोशी यांना नवगठित पाच सदस्यीय ‘मार्गदर्शक मंडळा’त स्थान देण्यात आले आहे़ प्रकृती अस्वास्थ्यामुळे वाजपेयी सक्रिय राजकारणापासून दूर आहेत़ त्यामुळे त्यांना या मंडळातून वगळणे अपेक्षित मानले जात होते़
मात्र आडवाणी आणि जोशी विद्यमान संसदेत खासदार आहेत. त्यांना वगळून भाजपाने पुन्हा एकदा पक्षात नव्या पिढीचे प्राबल्य राहणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत़ पक्षावर मोदींची पकड अधिक घट्ट झाल्याचे अप्रत्यक्ष संकेतही यातून मिळाले आहेत़ समितीतील सदस्य निवडीवेळी पाऊणशे वयोमानाचा निकष लावल्याचे बोलले जात आहे.
असे असेल संसदीय मंडळ
१ भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे नव्या पुनर्गठित १२ सदस्यीय संसदीय मंडळाचे अध्यक्ष राहणार आहेत.
२ तीनदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले शिवराजसिंह चौहान तसेच पक्षाचे सरचिटणीस जे.पी. नड्डा यांना संसदीय मंडळात स्थान देण्यात आले आहे.
३ या दोन्ही नेत्यांची पक्ष उमेदवार ठरविणार्या भाजपा केंद्रीय निवडणूक समितीवरही वर्णी लागली आहे. याशिवाय नरेंद्र मोदी, राजनाथसिंह, अरुण जेटली, सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू, नितीन गडकरी, अनंत कुमार, थावरचंद गहलोत आणि रामलाल हे या मंडळाचे सदस्य असतील.
केंद्रीय निवडणूक समितीचीही पुनर्रचना
- भाजपाने केंद्रीय निवडणूक समितीचीही पुनर्रचना केली असून यातून उत्तर प्रदेशचे नेते विनय कटियार यांनाडच्चू देण्यात आला आहे. भाजपा माहिला मोर्चाच्या माजी अध्यक्ष सरोज पांडे या समितीच्या पदसिद्ध सदस्य होत्या. त्यांच्या जागी महिला मोर्चाच्या नवनियुक्त अध्यक्षा विजया राहाटकर यांची वर्णी लागली आहे.
- अन्य सदस्यांमध्ये नरेंद्र मोदी, राजनाथसिंह, अरुण जेटली, सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू, नितीन गडकरी, अनंत कुमार, थावरचंद गहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा, रामलाल, शाहनवाज हुसैन, जुआल ओराम यांचा समावेश
प्रथमच मार्गदर्शक मंडळ
भाजपात प्रथमच मार्गदर्शक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. वाजपेयी, आडवाणी आणि जोशी यांच्याशिवाय नरेंद्र मोदी आणि राजनाथसिंह हे मार्गदर्शक मंडळाचे सदस्य असतील.
म्हणून समितीतून डावलले?
मोदी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड करण्यापासून आडवाणींनी त्यांना विरोध केला होता. त्यानंतर अनेक वेळा पक्षात त्यांना दुय्यम स्थान देण्यात आले. आताही त्यांना समितीतून डावलले.
इतर नेत्यांना मुक्तद्वार प्रवेश नाही
निवडणुका जवळ येत असताना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अन्य पक्षांमधून नेत्यांनी भाजपाकडे धावाधाव चालविली असली तरी भाजपाने दारे सताड उघडी केलेली नाहीत. या नेत्यांना प्रवेश देण्याची घाईही नाही, असा खुलासा केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.
अनेक नेते भाजपात येण्यास उत्सुक आहेत. पण आम्ही काळजीपूर्वक विचार करीत असून आमचे हात खुले नाहीत, असे ते लोकमतला प्रतिक्रिया देताना म्हणाले. अन्य पक्षाच्या सदस्यांचे पक्षात स्वागत करताना भेदभाव केला जात असेल तर त्याबाबत आम्हाला खेदही नाही. सर्व पक्षांमधून लोक येत आहेत पण आम्ही निवडक लोकांनाच स्थान देऊ. भाजपामध्ये प्रवेशाचे निकष ठरविण्यात आले आहेत. एकेकाळी काँग्रेसमधील घराणेशाहीचा मुद्दा लावून धरणार्या भाजपामध्ये आता ज्येष्ठ नेत्यांच्या मुलामुलींना पक्षात बढती दिल्या जात असल्याची बाब त्यांनी गैर मानली नाही. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या एका कन्येला लोकसभेचे तर दुसरीला विधानसभेचे तिकीट दिले जात असल्याबद्दल ते म्हणाले, काँग्रेसमध्ये सर्व अधिकार एकाच घराण्याकडे एकवटले आहेत. आमच्यात पक्ष हा सर्वोच्च असून हाच फरक आहे. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरविण्याबाबत भाजपा-शिवसेनेत मतभेद असल्याचा जावडेकर यांनी इन्कार केला. महाराष्ट्रात १९६0 पासून कोणत्याही पक्षाने कुणालाही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून समोर आणलेले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांचे नाव आधीच घोषित करण्याचे टाळले आहे. या मुद्याचा भाजपा-शिवसेनेच्या भवितव्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या अपमानाल भाजपा जबाबदार नाही
सोलापूर येथे २१ ऑगस्ट रोजी महामार्ग प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मोदी सर्मथकांनी हुर्यो उडविल्याबद्दल विचारण्यात आले असता जावडेकर म्हणाले की, आम्ही कुणालाही प्रोत्साहन दिले नाही. काँग्रेसच्या राजवटीवर लोक संतापले असतील तर आम्ही काय करणार?
मुख्यमंत्री कुणाचा ? उत्तर गोलमाल!
मुख्यमंत्री भाजपा की शिवसेनेचा असणार, या थेट प्रश्नावर ते म्हणाले, वेळ येईल तेव्हा आम्ही हा अडथळा दूर करू. जागावाटपाच्या मुद्यावर महायुतीत मतभेद असल्याचाही त्यांनी इन्कार केला. प्रत्येकच निवडणुकीत हा मुद्दा असतो आणि तो कोणत्याही अडचणीविना निकाली काढला जातो.
Web Title: Old menstruation
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.