Rahul Gandhi on odisha Student Case: ओडिशामध्ये एका २० वर्षीय विद्यार्थिनीने महाविद्यालयातील प्राध्यापकाकडून लैंगिक छळ सुरू असलेल्या लैंगिक छळाला कंटाळून स्वतःला पेटवून घेतले. मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोदोजी तुम्ही गप्प का आहात? असा सवाल केला आहे. प्रत्येकवेळी भाजपची व्यवस्था आरोपींना वाचवण्याचेच काम करते आहे, असा गंभीर आरोपही राहुल गांधींनी केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ओडिशातील बालासोरमध्ये असलेल्या फकीर मोहन ऑटोनॉमस महाविद्यालयातील २० वर्षीय विद्यार्थिनीने पेटवून घेतले. तिचा मंगळवारी भुवनेश्वर येथील एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्राध्यापकाकडून लैंगिक छळ केला जात होता. त्याची तक्रार तिने महाविद्यालय प्रशासनाकडे केली, पण प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही. तिने महाविद्यालयाच्या परिसरातच पेटून घेतले होते.
ही भाजपच्या व्यवस्थेने केलेली हत्या -राहुल गांधी
विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, 'ओडिशामध्ये न्यायासाठी झगडणाऱ्या एका मुलीचा मृत्यू. ही सरळ-सरळ भाजपच्या व्यवस्थेने केलेली हत्या आहे.'
'त्या धाडसी विद्यार्थिनीने लैंगिक छळाच्या विरोधात आवाज उठवला, पण न्याय देण्याऐवजी तिला धमकावलं गेलं. छळलं गेलं. तिला वारंवार अपमानित केलं गेलं. ज्यांच्यावर तिच्या रक्षकाची जबाबदारी होती, तेच तिच्यावर घाव घालत राहिले', असा संताप राहुल गांधींनी व्यक्त केला.
भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले -राहुल गांधी
राहुल गांधी म्हणाले, 'नेहमीप्रमाणे भाजपची व्यवस्था आरोपींना वाचत राहिली आणि एका निष्पाप लेकीला स्वतःला पेटवून घेण्यास भाग पाडले. ही आत्महत्या नाहीये, ही व्यवस्थेने केलेली सामूहिक हत्या आहे.'
'मोदीजी, ओडिशा असो की, मणिपूर... देशाच्या लेकी जळत आहेत. उद्ध्वस्त होत आहेत. मरत आहेत आणि तुम्ही गप्प बसला आहात? देशाला तुमचं मौन नकोय, उत्तर हवंय. भारताच्या लेकींना सुरक्षा आणि न्याय हवा आहे", अशी टीका राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर केली आहे.