ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेतून एक विचित्र घटना समोर आली आहे. सर्व झोपलेले असताना काही वर्गमित्रांनी ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यात फेविक्विक टाकलं. त्यामुळे विद्यार्थ्यांचे डोळे चिकटले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सेवाश्रम शाळेच्या वसतिगृहात ही घटना घडली. सध्या जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सेवाश्रम शाळा कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सालागुडा येथे आहे. येथे शुक्रवारी रात्री विद्यार्थी वसतिगृहात झोपले असताना काही वर्गमित्रांनी ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यात फेविक्विक टाकलं. त्यामुळे विद्यार्थ्यांचे डोळे चिकटले.
डोळे चिकटवल्यामुळे विद्यार्थ्यांना सकाळी डोळे उघडताच आले नाहीत. त्यानंतर त्यांना आधी गोछापाडा रुग्णालयात नेण्यात आलं आणि नंतर चांगल्या उपचारांसाठी फुलबनी जिल्हा मुख्यालय रुग्णालयात हलवण्यात आलं. एका विद्यार्थ्याला बरं झाल्यानंतर घरी सोडण्यात आलं आहे, तर इतर सात जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, फेविक्विकमुळे डोळ्यांचं खूप नुकसान झालं आहे. वेळेवर उपचार केल्याने गंभीर घटना टाळण्यास मदत झाली. या घटनेनंतर, जिल्हा प्रशासनाने शाळेचे मुख्याध्यापक मनोरंजन साहू यांना तात्काळ निलंबित केलं आहे.
विद्यार्थ्यांच्या डोळ्यात फेविक्विक का टाकण्यात आलं हे शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी मुलांची चौकशी सुरू केली आहे. याच दरम्यान, वसतिगृहात ही घटना कशी घडली हे जाणून घेण्यासाठी कंधमाल कल्याण अधिकारी रुग्णालयात गेले. तर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.