जुन्या गोव्यात भाविकांचा महासागर
By Admin | Updated: December 4, 2014 02:42 IST2014-12-04T02:42:49+5:302014-12-04T02:42:49+5:30
जुने गोवे येथील जगप्रसिद्ध सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त बुधवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावाने साजरे झाले.

जुन्या गोव्यात भाविकांचा महासागर
पणजी : जुने गोवे येथील जगप्रसिद्ध सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त बुधवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावाने साजरे झाले. पवित्र शवप्रदर्शन आणि फेस्त असा योगायोग आल्याने भाविकांची जुने गोवेकडे रिघ लागली होती.
मुंबईचे आर्चबिशप गोमंतकीय सुपुत्र कार्डिनल आॅसवल्ड ग्राशियस यांनी सकाळी १०.३० वाजता मुख्य प्रार्थनेच्यावेळी भाविकांना संबोधताना शांती, सलोख्याचा संदेश दिला. सर्वांच्या हृदयात सदाकाळ भावार्थ राहो, सर्वधर्म समभाव कायम राहो, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
गोव्याचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव, पोप यांचे माजी राजदूत बाल्सको कुलासो, गोव्याचे माजी आर्चबिशप राहुल गोन्साल्विस, पोर्तुगालचे बिशप कार्लुस आझावेदो आणि जुझे आल्फ्रेड, सिंधुदुर्गचे बिशप आॅल्विन बार्रेटो उपस्थित होते.
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शिकवणीनुसार प्रत्येकाने प्रेम आणि एकात्मतेने स्वत:चे जीवन फुलवावे. गरीब, गरजवंतांना मदत करा, असे आवाहन आर्चबिशप आॅसवल्ड यांनी केले.
पहाटे चार ते सकाळी नऊ वाजेपर्यंत तासातासाने प्रार्थना सुरू होत्या. सकाळी १०.३० वाजता मुख्य प्रार्थना झाली. आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव यांच्या हस्ते सेंट जोझेफ वाझ यांच्या जीवनावर आधारित ‘डिव्हाइन बॉण्डेज’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. सें कॅथेड्रल चर्चमध्ये पवित्र शवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. (प्रतिनिधी)