आता श्रीलंकेचाही सार्क परिषदेवर बहिष्कार
By Admin | Updated: September 30, 2016 17:36 IST2016-09-30T17:32:56+5:302016-09-30T17:36:33+5:30
भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान पाठोपाठ श्रीलंकेनेही पाकिस्तानात होणा-या सार्क परिषदेवर बहिष्कार घातला आहे.

आता श्रीलंकेचाही सार्क परिषदेवर बहिष्कार
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान पाठोपाठ श्रीलंकेनेही पाकिस्तानात होणा-या सार्क परिषदेवर बहिष्कार घातला आहे. सध्याच्या दक्षिण आशियाई देशांमधले वातावरण बघता सार्कमध्ये सहभागी होण्याची इच्छा नसल्याचे श्रीलंकेने म्हटले आहे.
दक्षिण आशियाई देशांमधले परस्पर सहकार्य यशस्वी होण्यासाठी शांतता आणि सुरक्षा हे घटक महत्वाचे आहेत. सार्कचा संस्थापक सदस्य या नात्याने प्रादेशिक सहकार्यासाठी कटिबद्ध आहोत असे श्रीलंकेने म्हटले आहे.
भारत, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि भूतान पाठोपाठ श्रीलंकेने नेपाळला पत्र लिहून सार्कमध्ये सहभागी होण्याची इच्छा नसल्याचे म्हटले आहे. सार्कचे अध्यक्षपद सध्या नेपाळकडे आहे. आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो असेही श्रीलंकेने स्पष्ट केले.
उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानात होणा-या सार्क परिषदेवर बहिष्कार घातला. त्यानंतर अफगाणिस्तान, बांगलादेश आणि भूताननेही सार्क परिषदेतून अंग काढून घेतले. आता श्रीलंकेनेही तीच भूमिका घेतली आहे. एकप्रकारे पाकिस्तानला एकाकी पाडण्याच्या भारताच्या रणनितीचे यश आहे.