आता अॅम्बेसेडरच्या ब्राण्डवर परदेशी मालकी
By Admin | Updated: February 11, 2017 11:50 IST2017-02-11T11:40:40+5:302017-02-11T11:50:04+5:30
एकेकाळी देशाच्या पंतप्रधानांपासून ते सर्वसामान्यांची पहिली पसंती असलेली अॅम्बेसेडर कार केव्हाच इतिहास जमा झाली.

आता अॅम्बेसेडरच्या ब्राण्डवर परदेशी मालकी
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 11 - एकेकाळी देशाच्या पंतप्रधानांपासून ते सर्वसामान्यांची पहिली पसंती असलेली अॅम्बेसेडर कार केव्हाच इतिहास जमा झाली. पण आता या कारचा ब्राण्डही भारतीय राहणार नाही. प्यूजो ही फ्रेंच कंपनी 80 कोटी रुपयांमध्ये हिंदुस्थान मोटर्सकडून अॅम्बेसेडरचा ब्राण्ड विकत घेणार आहे.
अगदी दशकभरापूर्वीपर्यंत सरकारी सेवेमध्ये अॅम्बेसेडर कारचा वापर सुरु होता. सीके बिर्ला समूहातील हिंदुस्थान मोटर्सने एसए प्यूजो कंपनीबरोबर ब्राण्ड विक्रीचा करार केला असून, या करारातंर्गत ट्रेडमार्कही दिला जाणार आहे. ब्राण्ड विक्रीतून येणा-या पैशामधून कर्मचारी आणि कर्जदारांची थकलेली देणी फेडण्यात येतील असे सीके बिर्ला समूहाच्या प्रवक्त्याने सांगितले.
तीन वर्षांपूर्वीच अॅम्बेसेडर कारचे उत्पादन बंद झाले. 60 ते 90 च्या दशकात अॅम्बेसेडर कारला भरपूर मागणी होती. अॅम्बेसेडर फक्त भारतीयांसाठी एक कार नव्हती तर त्याच्याशी भावना जोडलेल्या होत्या. भारताची ती एक ओळख होती. लुक्स पेक्षा अॅम्बेसेडरमध्ये आसनव्यवस्था ऐसपैस होती. त्यामुळे त्यावेळी ज्यांच्याकडे पैसा होता त्यांची पहिली पसंती अॅम्बेसेडर असायची. 1980 च्या दशकात वर्षाला 24 हजार अॅम्बेसेडर कार बनायच्या. 2013-14 पर्यंत ही मागणी 2500 पर्यंत घटली.