जे.पी. नड्डा यांचा भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपून बराच काळ लोटला तरी पक्षाला नवा अध्यक्ष सापडलेला नाही. सध्या जे.पी. नड्डा यांच्याकडे पक्षाच्या अध्यक्षपदाचा प्रभार आहे. तर भाजपाच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रिया काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता पक्षाने निवडणूक प्रक्रिया पुढे नेण्याच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. नड्डा यांचे उत्तराधिकारी म्हणून अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा झाली आहे. मात्र आता भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत केवळ दोन प्रमुख नावं उरली आहेत. भाजपाचे पुढील राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादव यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेच्या दिशेने पाऊल पुढे टाकले आहे. त्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेतृत्व समोर आणून सामाजिक संतुलन प्रस्थापित करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादव हे ओबीसी समुदायातील असून दीर्घकाळापासून पक्षसंघटनेमध्ये सक्रिय आहेत. गतवर्षी झालेल्या निवडणुकीत ओदिशामध्ये मिळवलेल्या विजयानंतर धर्मेंद्र प्रधान यांचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर होतं. मात्र ते केंद्रात मंत्रिपदावर कायम राहिले.
दरम्यान, मे महिन्याच्या अखेरीपर्यंत भाजपाच्या नव्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात प्रस्तावित बिहार विधानसभा निवडणुकीची तयारी नव्या नेतृत्वासह सुरू करणे शक्य होईल. मात्र सध्यातरी याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादव यांनी अनेक राज्यांमधील निवडणुकांमध्ये निवडणूक प्रभारी म्हणून चांगली कामगिरी केलेली आहे. मात्र अनुभव आणि संघटनेवरील प्रभावाची विचार करता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी धर्मेंद्र प्रधान यांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय हा पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडूनच घेतला जाऊ शकतो.