मोगली गर्लचे नाव आता ‘एहसास’, लखनौत वास्तव्य
By Admin | Updated: April 10, 2017 00:50 IST2017-04-10T00:50:25+5:302017-04-10T00:50:25+5:30
उत्तर प्रदेशात मोतीपूर भागात वन्यजीव अभयारण्यात जानेवारी महिन्यात सापडलेली मुलगी मोगली उर्फ वन दुर्गा हिला

मोगली गर्लचे नाव आता ‘एहसास’, लखनौत वास्तव्य
लखनौ : उत्तर प्रदेशात मोतीपूर भागात वन्यजीव अभयारण्यात जानेवारी महिन्यात सापडलेली मुलगी मोगली उर्फ वन दुर्गा हिला आता ‘एहसास’ नावाने ओळखले जाणार आहे. यापुढे तिचे वास्तव्य लखनौत असणार आहे. दोन महिने जिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तिला आता एका संस्थेच्या ताब्यात देण्यात आले आहे. निर्वाण संघटनेचे अध्यक्ष सुरेश धापोला म्हणाले की, ती यापूर्वी मनुष्यांसोबत राहिली नसल्यामुळे तिला संवाद साधता येत नाही. महिला व बालकल्याण मंत्री रिता बहुगुणा जोशी यांनी या संस्थेत येऊन मुलीची विचारपूस केली. या मुलीचे वय ११ वर्षे असल्याचे बहराईच जिल्हा रुग्णालयाने सांगितले आहे. या मुलीला आता ब्रश करण्यापासून ते अन्य दैनंदिन बाबी शिकविल्या जाणार आहेत. आतापर्यंत तिची देखभाल करणाऱ्या हॉस्पिटलमधील रेणू या महिला कर्मचाऱ्याने सांगितले की, ती बोलत नसली तरी आजूबाजूंच्या घटनांवर प्रतिक्रिया देत आहे. त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या मंद आहे असे म्हणता येणार नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार हॉस्पिटलमधील उपचार पूर्ण झाल्यानंतर आता या मुलीला नवी ओळख मिळाली असून मोगली ते ‘अहसास’पर्यंतचा हा प्रवास पूर्ण झाला आहे. तिला खऱ्या अर्थाने उभे करण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.