अब की बार मोदी का नंबर, दहशतवाद्यांनी भरकोर्टात दिली धमकी
By Admin | Updated: May 18, 2014 16:55 IST2014-05-18T16:55:54+5:302014-05-18T16:55:54+5:30
भोपाळ येथे पोलिसांच्या अटकेत असलेल्या सिमी संघटनेच्या दहशतवाद्यांनी न्यायालयाच्या आवारातच 'अब की बार मोदी का नंबर' अशी घोषणाबाजी करत मोदींना ठार मारण्याची धमकीच दिली.
अब की बार मोदी का नंबर, दहशतवाद्यांनी भरकोर्टात दिली धमकी
ऑनलाइन टीम
भोपाळ, दि. १८ - नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होणार असतानाच भोपाळ येथे पोलिसांच्या अटकेत असलेल्या सिमी संघटनेच्या दहशतवाद्यांनी न्यायालयाच्या आवारातच 'अब की बार मोदी का नंबर' अशी घोषणाबाजी करत मोदींना ठार मारण्याची धमकीच दिली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत मध्यप्रदेश पोलिसांनी या दहशतवाद्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मध्यप्रदेश पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी सिमी या प्रतिबंधित संघटनेच्या १५ दहशतवाद्यांना अटक केली होती. या दहशतवाद्यांचे इंडियन मुजाहिदीनशी या दहशतवादी संघटनेशी संपर्क असल्याचा पोलिस तपासात उघड झाले आहे. शनिवारी दुपारी या दहशतवाद्यांना भोपाळमधील कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. सुनावणीनंतर पोलिस या दहशतवाद्यांना घेऊन परतत होते. गाडीत बसताना यातील अबू फैजल या दहशतवाद्याने मोदींविरोधात घोषणाबाजीच सुरु केली. 'अब की बार मोदी का नंबर', दुनिया की एक ही ताकत अल्ला है, तालिबान आयेगा और मोदी जायेगा' अशी घोषणा बाजी सुरु केली. या घोषणाबाजीने कोर्टाच्या परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी त्या सर्व दहशतवाद्यांना गाडीत बसवून केंद्रीय कारागृहाच्या दिशेने निघून गेले. कोर्टाच्या आवारातच मोदींना धमकी दिल्याने कोर्टाच्या परिसरात खळबळ माजली होती.
दरम्यान, या घटनेनंतर मध्यप्रदेशमधील अतिरिक्त पोलिस महासंचालक (गुप्तवार्ता विभाग) सरबजीत सिंह यांनी संबंधीत दहशतवाद्यांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे. लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी या दहशतवाद्यांनी जाणूनबुजून ही घोषणाबाजी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही घटना आम्ही गंभीरतेने घेतली असून यापुढे या दहशतवाद्यांची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्याचे प्रयत्न सुरु आहेत असे त्यांनी सांगितले.