प्राप्तिकर विभागाची आता खरेदीवरही नजर
By Admin | Updated: May 17, 2017 01:39 IST2017-05-17T01:39:27+5:302017-05-17T01:39:27+5:30
एखाद्या व्यक्तीने जर महागडी वस्तू खरेदी केली किंवा मोठी गुंतवणूक केली आणि ही खरेदी त्याच्या उत्पन्नाशी मिळतीजुळती नसेल तर आयकर विभाग अशा प्रकरणात तपास

प्राप्तिकर विभागाची आता खरेदीवरही नजर
- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : एखाद्या व्यक्तीने जर महागडी वस्तू खरेदी केली किंवा मोठी गुंतवणूक केली आणि ही खरेदी त्याच्या उत्पन्नाशी मिळतीजुळती नसेल तर आयकर विभाग अशा प्रकरणात तपास
करणार आहे. मात्र, ही खरेदी उत्पन्नाशी मिळतीजुळती असेल तर चौकशी होणार नाही. त्यामुळे खरेदी करतानाही सावध राहावे लागणार आहे.
आयकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, केवळ मोठे ट्रान्झॅक्शन असल्यामुळे एखाद्याची चौकशी होणार नाही. तर, चौकशीसाठी अधिकाऱ्याकडे खास कारण असायला हवे.
जेव्हा तपास करणे गरजेचे आहे अशा वेळीच तपास केला
जाईल. सेंट्रल बोर्ड आॅफ डायरेक्ट टॅक्सेसच्या (सीबीडीटी) गत आठवड्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तपासासाठी आवश्यक असलेल्या अटींची समीक्षा करण्यासाठी ही बैठक बोलविण्यात आली होती.
या तपासात विशिष्ट मर्यादेपेक्षा अधिकचे ट्रान्झॅक्शन कॉम्युटरवर आधारित प्रणालीवर घेतले जातात. नियमित कर भरणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास होऊ नये हा यामागचा उद्देश आहे.
ज्या संस्थांमध्ये चुकीचे काम सुरु आहे तिथे अधिक लक्ष केंद्रीत करण्याचाही प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे.
हा विभाग डेटा जमविण्यासाठी ज्या स्त्रोतांचा उपयोग करतो त्यात दुसऱ्या देशांच्या टॅक्स अॅथोरिटीज आणि भारतातील मोठे व्यवहार यांचाही समावेश आहे.
कर चोरीच्या प्रयत्नांचा शोध लावण्यात येणार
- ‘आॅपरेशन क्लिन मनी’अंतर्गत काही नागरिकांची ओळख निश्चित करण्यात आली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकात जमा करण्यात आलेली मोठी रक्कम आणि मोठे व्यवहार याबाबत समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांचीही चौकशी होऊ शकते.
- या विभागाने मोठ्या प्रमाणात डेटा एकत्र केला आहे. यातून कर चोरीच्या प्रयत्नांचा शोध लावण्यात येणार आहे. अशा प्रकरणात ६० हजार नागरिकांची ओळख निश्चित करण्यात आली आहे. त्यांचा आता तपास करण्यात येणार आहे.