प्रचार संपला आता लक्ष मतपरीक्षेकडे
By Admin | Updated: February 5, 2015 18:51 IST2015-02-05T18:38:56+5:302015-02-05T18:51:28+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचारतोफा आता थंडावल्या असून शेवटच्या तृणमूल काँग्रेसने आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
प्रचार संपला आता लक्ष मतपरीक्षेकडे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा संध्याकाळी थंडावल्या असून शेवटच्या दिवशी तृणमूल काँग्रेस, ऑल इंडिया इमाम असोसिएशनने 'आप'ला पाठिंबा जाहीर केला आहे. तर दुसरीकडे डेरा सच्चा सौदानेही भाजपाला पाठिंबा जाहीर करत निवडणुकीतील रंगत वाढवली आहे. आता सर्वांचे लक्ष ७ फेब्रुवारीरोजी होणा-या मतदानाकडे लागले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत रोड शो काढून काँग्रेसचा प्रचार केला.
किरण बेदी यांनी प्रचारसभा घेत मतदारांशी संवाद साधला. अरविंद केजरीवाल यांच्याकडे प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नाही अशी घणाघाती टीका किरण बेदी यांनी केली. तर भाजपा मतदारांना विकत घेत असून काही ठिकाणी मतदारांना धमकीही दिली जात आहे असा गंभीर आरोप आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला. आता देशासाठी काम करायचे असून देव आमच्यासोबत आहे अशी भावनिक सादही केजरीवाल यांनी घातली.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी डेरा सच्चा सौदाने दिल्लीसाठी भाजपाला पाठिंबा जाहीर केला. दिल्लीतील डेरा सच्चा सौदाचे सुमारे २० लाख समर्थक असल्याचा दावा डेरा सच्चा सौदाने केला असून याचा भाजपाला कितपत फायदा होईल हे निकालानंतरच स्पष्ट होईल. डेरा सच्चा सौदाने साथ दिल्याने भाजपाला थोडा दिलासा मिळाला असला तरी आपला पाठिंबा देणा-यांची संख्या वाढली आहे. डावे पक्ष व जदयूपाठोपाठ तृणमूल काँग्रेस आणि ऑल इंडिया इमाम असोसिएशननेही शेवटच्या क्षणी आपला पाठिंबा जाहीर करत आपचे पारडे जड केले. दिवसभर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वतःला प्रचारात झोकून दिले होते. संध्याकाळी सहा वाजता प्रचारतोफा थंडावल्या. आता सर्वांचे लक्ष ७ फेब्रुवारीला होणा-या मतदानाकडे लागले आहे.
विजय किंवा पराभवही मोदींचाच - शत्रुघ्न सिन्हा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्णधार असल्याने दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजय किंवा पराभव हा त्यांचाच असेल असे सांगत भाजपा नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपाला घरचा आहेर दिला. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांची ताकद दिसत आहे अशा शब्दांत त्यांनी केजरीवाल यांचे कौतुक केले. शत्रुघ्न सिन्हा यांच्या या विधानामुळे भाजपाची चांगलीच कोंडी झाली होती.