खासदारांपाठोपाठ आता मोदींचे सचिवांनाही धडे
By Admin | Updated: July 23, 2014 02:25 IST2014-07-23T02:25:27+5:302014-07-23T02:25:27+5:30
आचार, चरित्र आणि विचारधारेबद्दल आपल्या खासदारांना प्रशिक्षण दिल्यानंतर भाजपा आता खासदारांच्या खासगी सचिवांना प्रशिक्षण देणार आहे.

खासदारांपाठोपाठ आता मोदींचे सचिवांनाही धडे
जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
आचार, चरित्र आणि विचारधारेबद्दल आपल्या खासदारांना प्रशिक्षण दिल्यानंतर भाजपा आता खासदारांच्या खासगी सचिवांना प्रशिक्षण देणार आहे.
भाजपाने आपले खासदार आणि मंत्र्यांच्या बिगर सरकारी खासगी सचिव, ओएसडी आणि खासगी सहायकांना पक्षाच्या धोरणाची माहिती देण्यासाठी 19 ते 24 ऑगस्टर्पयत मुंबईतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत सहा दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. प्रबोधिनीचे महासंचालक विनय सहस्रबुद्धे यांच्या देखरेखीखाली ही कार्यशाळा होणार आहे.
खासदारांच्या खासगी सचिवांना वर्तणूक-व्यवहार याबद्दल प्रशिक्षण देणो गरजेचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी भाजपाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत सांगितले. भुतकाळात खासदारांशी संबंधित जेवढे घोटाळे आणि स्टिंग ऑपरेशन झाले त्यातील बहुतांश प्रकरणांत संबंधित खासदाराचा खासगी सचिव निमित्त ठरला. पक्षाच्या खासदारांनी अधिवेशनाच्या काळात वेळेआधी सभागृहात पोहोचावे, प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य तास तसेच अन्य महत्त्वाच्या चर्चेसमयी उपस्थित राहण्यावर मोदींनी भर दिला.
भाजपाने काही दिवसांपूर्वी हरियाणाच्या सूरजकुंड येथे आपल्या खासदारांचे प्रशिक्षण आयोजित केले होते. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक विनय सहस्रबुद्धे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, खासदारांच्या खासगी सचिवांच्या कार्यशाळेत प्रामुख्याने तीन विषय हाताळले जातील. त्यांना पक्षाचा इतिहास, विचारधारा, पत्रव्यवहार आणि सोशल मीडियाशी संबंध निर्माण करून त्याचा उपयोग आपल्या खासदारांचा लोकसभा मतदारसंघ आणि क्षेत्रीय विकास कार्याचा सकारात्मक प्रचार करण्याबद्दल प्रशिक्षण दिले जाईल. यासोबतच खासदारांच्या स्थानिक क्षेत्रीय विकास निधी, खासदारांना मिळणा:या अन्य सोयीसुविधांच्या वापराबद्दलदेखील सांगण्यात येईल.
खासदारांसोबतच मंत्र्यांचे बिगर सरकारी खासगी सचिव, ओएसडी आणि खासगी सहायकांचीदेखील कार्यशाळा आयोजित केली आहे. प्रशिक्षण देणारे भाजपा व संघाचे नेते, प्रचारक आणि काही व्यावसायिकांची यादी तयार करण्यात येत आहे.