नवी दिल्ली : तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवसांच्या गर्भवती महिलांना भारतीय स्टेट बॅंकेने तात्पुरत्या अनफिट ठरविण्याच्या परिपत्रकाची दिल्ली महिला आयाेगाने गंभीर दखल घेतली आहे. आयाेगाने बॅंकेला नाेटीस पाठविली असून अशाप्रकारचे नियम बनविण्यामागची प्रक्रिया व त्यांना मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे कळविण्याचे आदेश दिले. सर्व स्तरातून टीका होताच एसबीआयने हे वादग्रस्त परिपत्रक स्थगित केले आहे.एसबीआयने गर्भवती महिलांना बॅंकेत भरतीबाबत नियमांमध्ये बदल केले. ३ महिन्यांहून अधिक दिवसांच्या गर्भवती तात्पुरत्या स्वरुपात अयाेग्य किंवा अनफिट मानल्या जातील. प्रसूतीच्या ४ महिन्यांनंतर त्या रुजू हाेऊ शकतील. नवी नाेकरभरती किंवा पदाेन्नती झालेल्यांसाठी हे नियम हाेते. ज्या तीन महिन्यांपेक्षा कमी दिवसांच्या गर्भवती असतील, त्या पात्र ठरतील, असे नियमांमध्ये म्हटले हाेते. हे नियम बेकायदेशीर, भेदभावपूर्ण आहे, असे दिल्ली महिला आयाेगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी म्हटले. नवे नियम मागे घेण्याची सूचनाही केली.
गर्भवती महिलांबाबतचे पत्रक ‘एसबीआय’कडून स्थगित, दिल्ली महिला आयाेगाने दिलेली नाेटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 06:48 IST