वड्रा यांच्या कंपनीला आयकरकडून नोटीस
By Admin | Updated: January 2, 2015 02:32 IST2015-01-02T02:32:05+5:302015-01-02T02:32:05+5:30
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्याशी संबंधित असलेल्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी या कंपनीला आयकर विभागाने नोटीस जारी केली.

वड्रा यांच्या कंपनीला आयकरकडून नोटीस
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्याशी संबंधित असलेल्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी या कंपनीला आयकर विभागाने नोटीस जारी केली. आयकर विभागाने या नोटिशीत २२ प्रश्नांचा संच पाठवून कंपनीला तिच्या आर्थिक आणि जमिनीबाबतच्या व्यवहारांचा तपशील मागितला आहे.
ही सामान्य प्रशासकीय प्रक्रिया असल्याचे भाजपाने म्हटले आहे तर यामागे राजकीय सूडभावना असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. सर्व आर्थिक आणि जमीन सौद्यांची विस्तृत माहिती मागविणारी ही नोटीस एक आठवड्यापूर्वी बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. डीएलएफ कंपनीसोबत जमिनीचा सौदा केल्यावरून स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी आयकर विभागाने कंपनीला दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. संशयास्पद व्यवहारांची माहिती मागविणे ही आयकर विभागाची जबाबदारी आहे. वड्रा यांनी असे अनेक संशयास्पद व्यवहार केलेले आहेत आणि आता त्याबाबत स्पष्टीकरण देण्याची त्यांना संधी आहे, असे भाजपाचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव म्हणाले. (वृत्तसंस्था)