बिहारसंदर्भात शरद यादवांशी चर्चा नाही - लालू यादव
By Admin | Updated: May 18, 2014 12:45 IST2014-05-18T12:45:50+5:302014-05-18T12:45:50+5:30
जदयू नेत्यांशी बिहारमध्ये युती करण्यासाठी आत्तापर्यंत कोणतीही चर्चा झालेली नाही असे स्पष्टीकरण देत लालूप्रसाद यादव यांनी जदयूला धक्का दिला आहे.

बिहारसंदर्भात शरद यादवांशी चर्चा नाही - लालू यादव
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १८ - बिहारमध्ये सत्ता स्थापनेसाठी जनता दल संयुक्तने लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी यूती करण्याचे संकेत दिले असतानाच लालूप्रसाद यादव यांनी मात्र जदयूशी आत्तापर्यंत कोणतीही चर्चा झालेली नाही असे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे राजदशी हातमिळवणी करुन सत्ता कायम ठेवण्याचे स्वप्न बघणा-या जदयू नेत्यांना लालूंनी तोंडघशीच पाडले आहे.
लोकसभा निवडणुकीत बिहारमधील निराशाजनक कामगिरीची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री नितीशकुमारांनी राजीनामा दिला होता. यानंतर बिहारमध्ये जदयूने नवीन मुख्यमंत्र्याचा शोधही सुरु केला आहे. शनिवारी जदयू नेते शरद यादव यांनी जूने मतभेद विसरुन सर्वांसोबत काम करु असे सांगत लालूप्रसाद यादव यांच्या राजदसोबत युतीचे संकेत दिले होते. रविवारी सकाळी नितीशकुमार व लालूप्रसाद यादव यांच्यात युतीसंदर्भात फोनवर चर्चा झाल्याचे वृत्त होते. मात्र रविवारी दुपारी लालूप्रसाद यादव यांनी हे वृत्त फेटाळून लावले.
युतीसंदर्भात जदयू नेते शरद यादव व नितीशकुमार यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही राज्यातील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. उद्या राजदच्या आमदारांची बैठक होणार असून या बैठकीत पुढील रणनितीवर चर्चा करु असे लालूप्रसाद यादव यांनी सांगितले.