केवळ पोकळ आश्वासनांनी बदल होत नाही - हुल
By Admin | Updated: June 18, 2015 01:40 IST2015-06-18T01:40:59+5:302015-06-18T01:40:59+5:30
केंद्रातील मोदी सरकार आणि दिल्लीतील केजरीवाल सरकार केवळ पोकळ आश्वासने देत सुटले आहेत. पण केवळ पोकळ आश्वासने देऊन बदल साध्य होऊ शकत नाही, अशी टीका काँगे्रस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केली.

केवळ पोकळ आश्वासनांनी बदल होत नाही - हुल
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार आणि दिल्लीतील केजरीवाल सरकार केवळ पोकळ आश्वासने देत सुटले आहेत. पण केवळ पोकळ आश्वासने देऊन बदल साध्य होऊ शकत नाही, अशी टीका काँगे्रस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केली. विकासाच्या नावावर गरिबांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पाठींबा दर्शविण्यासाठी राहुल गांधी गत सहा दिवसांत दुसऱ्यांदा जंतरमंतरवर पोहोचले. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी मोदी आणि केजरीवाल सरकारला जोरदार लक्ष्य केले.
हा लढा दिल्ली वा देशाच्या स्वच्छतेसाठी नाही तर तुमच्या सन्मानासाठी आहे. माझी ताकद तुम्हाला देऊन मी तुमच्यासाठी तुमच्यातला एक होऊन लढू इच्छितो. तुमच्याचसाठी नाही तर तुमच्यासकट शेतकरी, कामगार आणि देशातील सर्व दुर्बल आणि उपेक्षित लोकांसाठी मी लढू इच्छितो,असे ते म्हणाले. मोदी आणि केजरीवाल सरकारला केवळ आश्वासनांनी बदल घडेल असे वाटते. पण नुसत्या पोकळ आश्वासनांनी बदल घडत नसतो, असेही ते म्हणाले.
भू संपादन विधेयकाच्या मुद्यावर मोदी सरकारला लक्ष्य करताना, केंद्रातील सरकारने विकासाच्या नावावर गरिबांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवण्याचे धोरण अवलंबले असल्याचा आरोप त्यांनी केला. गरिबांना काय लाभ होणार, या प्रश्नाचे या सरकारकडे कुठलेही उत्तर नसते. आम्हाला असा विकास नको आहे, असे ते म्हणाले.