लाडकी बहीण योजनेला मिळालेल्या यशानंतर भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीने पुन्हा सत्ता आल्यास राज्यातील महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचं वचन दिलं होतं. मात्र राज्याची सध्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याने सरकारने सध्यातरी लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देण्याचं आश्वासन पूर्ण केलेलं नाही. मात्र भाजपाची सत्ता असलेल्या हरियाणामध्ये सरकारने महिलांना लाडो लक्ष्मी योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना दरमहा २१०० रुपये एवढी आर्थिक मदत दिली जाणार आहे.
या योजनेबाबत हरयाणाच्या वित्तमंत्र्यांनी सांगितले की, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी २०२५-२६ या वर्षासाठी ५ हजार कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. ही रक्कम महिलांच्या दैनंदिन जीवनातील आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी मदत होईल. त्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, मी २०२४-२५ या वर्षासाठीची १२ हजार ९७५.८१ कोटी रुपये ही संशोधित अंदाजित रक्कम २८.३ टक्क्यांनी वाढवून २०२५-२६ या वर्षासाठी १६ हजार ६५०.७८ रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे.
२०२४ मध्ये झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये भाजपाने महिलांना दरमहा २१०० रुपये एवढी रक्कम देण्याचं आश्वासन दिलं होतं. आता या योजनेचा लाभ लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचवण्याची तयारी सरकारकडून पूर्ण करण्यात आली आहे.