लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत मंगळवारी सकाळी दाट धुके पसरल्याने दृश्यमानता कमालीची घटली. त्यामुळे किमान २५ रेल्वे नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावल्या. पंजाब, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशसह डझनहून अधिक राज्यांत धुक्यामुळे दृश्यमानता कमालीची घटली होती. जम्मू-काश्मीरात काही ठिकाणी तापमानात वाढ झाल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला आहे. श्रीनगमध्ये गोठणबिंदूच्या वर तापमानाची नोंद झाली. हिमाचल प्रदेशात पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.
पंजाब, हरयाणात कडाक्याची थंडी
- पंजाब व हरयाणा राज्यामध्ये मंगळवारीदेखील कडाक्याची थंडी पसरली होती. गुरुदासपूर जिल्ह्यात सर्वात कमी ५ अंश सेल्सिअस तापमानाची होते.
- पंजाबच्या अमृतसरमध्ये किमान तापमान ६.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. ते सामान्य तापमानापेक्षा २ अंश सेल्सिअसने कमी होते.
उटीत शून्य तापमान
उत्तरेसोबत दक्षिणेकडील राज्य तमिळनाडूतील पर्वतीय क्षेत्रात उटी नावाने प्रसिद्ध असलेल्या उधगमंडलम येथे शून्य अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उटीपासून काही अंतरावर हिमस्खलन झाल्याने तापमानात अधिकच घट झाली.हिमस्खलनाच्या क्षेत्रात तापमान शून्य ते दोन अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवले गेले. कडाक्याच्या थंडीमुळे स्थानिक लोकांचे प्रचंड हाल झाले आहेत. थंडीमुळे चहाच्या मळ्यांवर विपरीत परिणाम होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.