मध्य प्रदेशातील इंदूर शहरात यंदाच्या विजयादशमीला एक आगळेवेगळे दृश्य पाहायला मिळणार आहे. महालक्ष्मी मेळा ग्राऊंडवर सुरू असलेल्या रावण दहनाच्या परंपरेत बदल करत 'पौरुष' या पत्नी पीडित पुरुषांच्या संस्थेने यंदा 'शूर्पणखा दहन' आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थेचे म्हणणे आहे की, समाजात अशा महिला गुन्हेगारांना समोर आणणे आवश्यक आहे, ज्यांनी आपल्या पतीची किंवा निष्पाप तरुणांची निर्घृण हत्या केली आहे.
अकरा मुखी पुतळ्यावर महिला गुन्हेगारांचे फोटोसंस्थेने ११ मुखांचा एक पुतळा तयार केला आहे. या पुतळ्यावर अशा महिला गुन्हेगारांचे फोटो लावण्यात येणार आहेत, ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांची हत्या केली आहे. यामध्ये सर्वात चर्चेत असलेले नाव सोनम हिचे आहे. सोनमने हनीमूनसाठी शिलाँगला नेऊन आपल्या पतीची, राजा रघुवंशीची हत्या केली. या पुतळ्यातील रावणाच्या मुख्य चेहऱ्याच्या जागी सोनमचा फोटो लावण्यात येणार आहे. तर, यासोबतच पतीला संपवणाऱ्या मुस्कानचाही यावर फोटो असणार आहे. सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे पोस्टर्स 'मॉडर्न कलयुगी शूर्पणखा' या नावाने व्हायरल होत आहेत.
पत्नी पीडित पुरुषांची संघटना करणार आयोजनपत्नी पीडित पुरुषांच्या संघटनेचे म्हणणे आहे की, अनेक वर्षांपासून पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाबाबत कोणीही आवाज उठवत नाही. त्यामुळेच रावण दहनाच्या जागी अशा महिला गुन्हेगारांच्या पुतळ्यांचे दहन केले जाईल, ज्यांनी कौटुंबिक जीवनाला कलंक लावला आहे. हा अनोखा कार्यक्रम २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी राजा रघुवंशी यांच्या कुटुंबाला देखील आमंत्रण देण्यात आले आहे.
दुसरीकडे, शिलाँग येथील हाय प्रोफाइल हनीमून खून प्रकरणात सोनमने कोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे. पूर्व खासी हिल्स पोलिसांनी या प्रकरणात ७९० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. सोनमच्या वकिलांनी आरोपपत्रातील त्रुटींवर आक्षेप घेत जामीन अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणी लवकरच स्थानिक न्यायालयात सुनावणी होणार आहे.