‘भारताला कुणीही धमकावू शकत नाही’
By Admin | Updated: October 22, 2014 05:07 IST2014-10-22T05:07:28+5:302014-10-22T05:07:28+5:30
अरुणाचल प्रदेशमधील मॅकमोहन रेषेजवळ महामार्ग उभारण्याच्या भारताच्या योजनेला खीळ घालू पाहणाऱ्या चीनला केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे़

‘भारताला कुणीही धमकावू शकत नाही’
मानेसर (हरियाणा) : अरुणाचल प्रदेशमधील मॅकमोहन रेषेजवळ महामार्ग उभारण्याच्या भारताच्या योजनेला खीळ घालू पाहणाऱ्या चीनला केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे़ भारताला कुणीही धमकावू शकत नाही़ भारत हा एक शक्तिशाली देश आहे, असे राजनाथसिंह गुरुवारी म्हणाले़
चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अरुणाचल लगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर देशाच्या इतिहासातील सर्वात महागडा रस्ता बांधण्याची भारताची योजना आहे. तथापि चीनने या योजनेला तीव्र विरोध केला आहे़
सीमावादावर अंतिम तोडगा निघण्यापूर्वी परिस्थिती गुंतागुंतीची होईल, अशी कोणतीही कृती भारत करणार नाही ही आम्हाला आशा असल्याचे चीनचे विदेश प्रवक्ते हाँग ली यांनी काल बुधवारी म्हटले
होते़ राजनाथसिंह यांना चीनच्या या विरोधाबाबत विचारले असता आज कुणीही भारताला धमकावू शकत नाही, असे उत्तर त्यांनी दिले़ भारत आणि चीनने सीमावादावर चर्चेतून तोडगा काढायला हवा, असेही ते म्हणाले़
(वृत्तसंस्था)